रेल्वे प्रवाशांकडेही लक्ष द्या

मुंबईतून पुणे किंवा कोकणात जाण्यासाठी शिवडी ते नाव्हा शेवा असा अटल सागरी सेतू बांधून तयार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 12 जानेवारीला त्याचे लोकार्पण होणार आहे. या प्रकल्पामुळे 22 किलोमीटरचे अंतर 15 ते 20 मिनिटात पार करता येणार आहे. मुंबईच्या विकासाला चालना देणारा प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जात असले तरी त्यामुळे सध्या सर्वात जास्त गर्दीची वाहतूक सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर त्याचा कितपत परिणाम होईल याबाबत साशंकताच आहे. मुंबईहून वाशी खाडी पूल मार्गे प्रवास करणारी बरीचशी वाहने या सागरी सेतुवरून जाणार असल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडी काही अंशी फुटेल. मात्र रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा कुठलाही फायदा होणार नाही. हार्बर मार्गावर रेल्वे ट्रॅक वाढवण्यात येत असलेल्या अडचणी, नवी मुंबईच्या पुढे वाढत चाललेली लोकवस्ती व त्याचा रेल्वे सेवेवर पडत असलेला ताण पाहता सर्वसामान्य प्रवाशांना विचारात घेऊन हार्बर रेल्वे वृद्धिंगत करण्याची गरज आहे. या मार्गावर सध्या भरमसाठ संख्येत वाढलेला प्रवाशी भार हलका करण्यासाठी उपाययोजना आखणे अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक भक्कम करत असताना सर्वसामान्य प्रवाशांना नजरेसमोर ठेवून सोयी सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. रस्ते मार्ग सुधारायला हवेत याविषयी दुमत नाही पण आज उपनगरवासीय व नवी मुंबईकरांची सर्वात मोठी गरज लोकलगर्दी कमी करणे हीच आहे हे सत्य दुर्लक्षित करता येणार नाही. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त