डॉ नेहा कोळी यांची अभियानातून एक्झिट
डॉ नेहा कोळी या आणखी एका अधिकाऱ्याने अभियान कार्यालयातून एक्झिट घेतली. गेल्या पाच वर्षांपासून नागरी आरोग्य अभियानाच्या व मागील वर्षभरापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या राज्य कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ कोळी यांनी नुकताच कार्यालयाचा निरोप घेतला. नागरी अभियानात काम करताना महानगरपालिकांमधील यंत्रणांसोबत त्यांचा दांडगा संपर्क तयार झाला होता. वैद्यकीय क्षेत्रात बिडीएस आणि एमबीए इन हेल्थ केअर मध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर मुंबई महानगरपालिकेमध्ये शहरी अभियानात शहर कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून काम पाहिले व त्यानंतर त्या राज्य कार्यालयात २०१७ मध्ये राज्य कार्यक्रम अधिकारी म्हणून रुजू झाल्या. नोव्हेंबर २०२२ पासून त्यांनी संपूर्ण एनएचएमच्या एसपीएम पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहिला. सीआरएम, यशदा येथील राज्यस्तरीय कार्यशाळा, जागतिक महिला दिनाचे कार्यक्रम, विविध बैठकांचे नियोजन, सादरीकरण, माहिती संकलन, पीआयपी इत्यादी कामकाजात त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली. कार्यकारी समितीच्या सर्वाधिक बैठका त्यांच्या कारकिर्दीत पार पडल्या ज्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. इतक्या प्रचंड व्यापातही अभियानातील आरोग्य योजनांवर सनियंत्रण करत असताना त्यांच्या कामात एक प्रकारची सहजता दिसून येत होती. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील एसपीएम पद रिक्त झाल्यावर तो कार्यभार देखील ओघाने त्यांच्याकडे आला व त्याला आपल्या परीने न्याय देत राज्यातील सर्व जिल्ह्यांसोबत व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत समन्वय साधत असताना केंद्रिय अधिकाऱ्यांसोबतदेखील त्यांचा समन्वय कौतुकास्पदच राहिला. कार्यालयातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे वर्तन, स्वभाव सौहार्दपूर्ण असेच होते. स्वतःचे काम प्रामाणिकपणे करत असताना कुणाविषयीही राग, द्वेष, मत्सर त्यांच्या वागण्यातून दिसून आला नाही. कामानिमित्त त्यांचेशी जवळपास दररोज संपर्क साधावा लागायचा. मात्र कुठलीही माहिती, अहवाल देण्यासाठी त्या तत्पर असायच्या. एसपीएम सेलबरोबर त्यांचे असलेले मैत्रीपूर्ण नाते त्यांच्या छोटेखानी निरोप समारंभातही दिसून आले. टाटा रुग्णालयात सेवेची संधी मिळणार असल्याने त्यांनी अभियानातून बाहेर पडण्याचा घेतला असला तरी नव्या जबाबदारीला त्या पुरेपुर न्याय देतील यात शंका वाटत नाही. यापुढेही संपर्कात राहण्याचा शब्द घेऊन सवयीप्रमाणे त्यांना पुस्तक भेट देत निरोप दिला.
वैभव
Comments
Post a Comment