देशात सद्भावना, परोपकार, शांतता, प्रामाणिकता व सत्यमार्गाचा आदर्श
जवळपास ५०० वर्षांनंतर आयोध्या ह्या आपल्या जन्मस्थळावर श्री रामांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होत आहे ही समस्त हिंदू व भारतवासीयांसाठी आनंदाची बाब आहे. आपला देश मुळात ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी लाभलेला देश आहे. या ठिकाणी वास्तव्य केलेले धार्मिक गुरु, संत, देवता यांनी लोकांना सत्य व आदर्शवादाची शिकवण दिली. याच आदर्शवादी शिकवणुकीमुळे भारत आज जगात सर्वात सुसंस्कारित देश म्हणून ओळखला जातो. प्रभू रामचंद्र हे एक आदर्श पुत्र, एकपत्नी, एकवचनी व संघर्ष योद्धा म्हणून ओळखले जातात. त्यांचे भव्य मंदिर अयोध्येत व्हावे ही अनेक वर्षांपासूनची अनेक पिढ्यांची इच्छा होती. ती पूर्णत्वास जाण्याची वेळ या वर्षी आली ही आजच्या पिढीसाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. याबद्दल सध्याचे सरकार व ज्यांनी ज्यांनी या शुभ दिनासाठी प्रयत्न केले त्यांचे आभार देशवासियांनी मानलेच पाहिजेत. श्री रामांच्या आयोध्येतील प्रतिष्ठापणा दिनी संपूर्ण देशात एक भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. यातून अनेक चांगल्या गोष्टी देशभरात घडत आहेत. देवस्थळांची साफसफाई, सामाजिक उपक्रम तसेच अनेक गावांमध्ये दारूबंदी, मांसबंदी या निमित्ताने केली जात आहे. प्रभू रामांचे आदर्श व त्यांचे विचार या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचत आहेत. श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेचा हा उत्साह, जल्लोष देशात सद्भावना, परोपकार, शांतता, प्रामाणिकता व सत्यमार्गाचा आदर्श घेऊन येईल ही अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment