सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रबळ हवी
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या बिनधास्त, रोखठोक भूमिकेसाठी प्रचलित आहेत. अनेक राजकीय, बिगर राजकीय विषयांवर ते आपली सडेतोड भूमिका जाहीर कार्यक्रमांमधून व्यक्त करत असतात. महाराष्ट्रातील रस्ते बांधणीचे अनेक मोठमोठे प्रकल्प त्यांच्या दूरदृष्टी स्वभावामुळेच सिद्धीस गेले हे सत्य नाकारता येणार नाही. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्ग असो की समृद्धी महामार्ग अशा अनेक महत्वपूर्ण राष्ट्रीय महामार्गांमध्ये त्यांचे मौलिक योगदान लपून राहिलेले नाही. वाहतूक कोंडीतून सुटका करणारे देशातील सर्वाधिक उड्डाणपूल त्यांच्याच काळात झालेले आहेत. देशात वाढत चाललेली वाहन संख्या व त्यामुळे होणारे प्रदूषण यावर मार्ग काढण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय त्यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात उद्भवणाऱ्या काही तांत्रिक अडचणी पाहता अद्यापही हा पर्याय पूर्णपणे यशस्वी होऊ शकलेला नाही. प्रदूषणाला मुख्य कारणीभूत ठरत असलेली खाजगी वाहतूक थोपवायची असेल तर सार्वजनिक वाहतुकीचे जाळे निर्माण करून सर्व स्तरांतील लोकांना सोयीस्कर व आरामदायी वाहतूक व्यवस्था सरकारने तयार करायला हवी जेणेकरून अधिकाधिक प्रमाणात लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील व रस्त्यावरील वाहन संख्या कमी होईल. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जैविक इंधन, सीएनजी, ग्रीन हायड्रोजन यासारखे पर्याय अधिकाधिक प्रमाणात वापरात आणायला हवेत. यासाठी सरकारी प्रयत्नांबरोबरच लोकांमधील जागरूकता देखील तितकीच महत्वाची आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment