श्री राम जय राम जय जय राम
आयोध्येतील श्री राम प्रतिष्ठापना दिवस नवी मुंबईत उत्साहात साजरा
आयोध्येतील श्री राम मंदिर प्रतिष्ठापणा दिनाच्या निमित्ताने नवी मुंबईत सर्वत्र जल्लोष पाहायला मिळाला. भगवे ध्वज व शोभायात्रांनी रस्ते व्यापून गेल्याचे मनोहारी व उत्साहवर्धक दृश्य सर्वत्र होते. अयोध्येत श्री राम मंदिर व मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापे येथील श्री राम मंदिरात गेले तीन दिवस हा उत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी दिवसभर मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. श्री राम मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट व स्व श्री अमृत पाटील यांच्या परिवाराच्या वतीने या दिवशी महाप्रसादाचे वाटप भाविकांमध्ये करण्यात आले. तब्बल पाच दशकानंतर अयोध्येत श्री रामांचे आगमन झाल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. जुहूगाव येथील हनुमान मंदिरात आज दिवसभर हजारो भक्तांनी श्री हनुमंतांचे दर्शन घेत हा उत्सव दिन साजरा केला. यावेळी दिवसभर मंदिरात भजन, हरिपाठ आदी कार्यक्रमांचे आयोजन मंदिर ट्रस्टमार्फत करण्यात आले. सायंकाळी मंदिरात सर्वत्र रांगोळी व दिव्यांची आरास करण्यात आली होती. समस्त हिंदू धर्मीयांसाठी हा दिवस ऐतिहासिक असल्याचे सांगून प्रभू श्री रामचंद्रांची लीला अगाध असल्याचे मत ट्रस्टचे संस्थापक व ग्रामस्थ श्री लालचंद भोईर यांनी व्यक्त केले. मंदिरांसोबतच अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही राम प्रतिष्ठापनेचा जल्लोष पाहायला मिळाला. घणसोलीतील वैभवशाली को ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटीत यानिमित्ताने रांगोळी व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सोसायटीत प्रभूरामचंद्रांची महाआरती करून उत्सवाची सांगता झाली. यावेळी सोसायटीतील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैभव पाटील
Comments
Post a Comment