योग्य वेळी योग्य समुपदेशन आवश्यक

श्री कल्पेश माधुरी मनोहर शिंदे, शिक्षक समुपदेशक
नैराश्यात गेलेल्या व्यक्तीला योग्य वेळी योग्य समुपदेशन मिळाले तर त्याचे आयुष्य अंधाराकडे न जाता त्याच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचा प्रकाश पडू शकतो. यासाठी समुपदेशकाची भूमिका फार मौलिक असते. असे प्रामाणिक व शुद्ध हेतू ठेवणारे समुपदेशक समाजात दुर्मिळ झालेले आहेत. मात्र आपला शिक्षकी पेशा सांभाळत विद्यार्थी व अनेकांच्या आयुष्यात आपल्या समुपदेशनाने नवी पालवी फोडण्याचे काम कल्याणच्या रायते विभाग हायस्कूलचे शिक्षक समुपदेशक कल्पेश मनोहर शिंदे हे करत आहेत. मूळचे वाडा तालुक्यातील बिलघर या गावचे कल्पेश यांनी आजवर अनेक शाळांमध्ये, कार्यक्रमांमध्ये व्याख्याने देत ज्ञानाचा झरा सर्वांसाठी खुला केला आहे. समुपदेशनाने बुद्धीची मशागत होते, अंतःकरण विशाल होतं, निराशा दूर होते, स्वयंविश्वास वाढतो, बौद्धिक विकास होतो, सकारात्मकता व संवेदनशीलता वाढते, कौशल्य विकसित होतं, जीवनाला लयबद्धता येऊन शिस्त लागते ही धारणा ठेवणारे कल्पेश शिंदे हे स्वतः कल्याण येथे ॐ मन:सामर्थ्यदाता समुपदेशन केंद्र चालवतात. त्यांना समुपदेशन व शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल आजवर अनेक पुरस्कारदेखील प्राप्त झालेले आहेत. अनेक संस्थांनी त्यांना गौरविले आहे. अशा ह्या उत्कृष्ठ समुपदेशक, विद्यार्थीप्रिय शिक्षक, सर्जनशील कर्तृत्व म्हणून ओळख निर्माण झालेल्या श्री कल्पेश शिंदे सरांच्या भेटीचा योग नुकताच गावी एका साखरपुडा समारंभाच्या निमित्ताने आला. त्यावेळी त्यांचेशी मनसोक्त गप्पा मारल्या. कल्याण पंचायत समितीतर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आधुनिक संगणकीय शिक्षणाच्या संधी या विषयावर त्यांनी तयार केलेल्या ऍप्लिकेशनला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले ज्यात त्यांनी मुलांच्या सहभागातूनच शैक्षणिक सॉफ्टवेअर तयार केल्याचे सांगून त्याविषयी सविस्तर माहितीही दिली. नैराश्यातून आत्महत्तेचा दुर्दैवी विचार करणाऱ्यांना समुपदेशनाद्वारे पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्नदेखील उदाहरणांसह कथित केले. आपल्या अष्टपैलू, हरहुन्नरी, समाजोपयोगी व्यक्तिमत्वाने अनेकांना भुरळ घालणारे कल्पेश शिंदे हे सोशल मिडियावरदेखील तितकेच सक्रिय आहेत. आपल्या चांगल्या गोष्टी समाजासमोर आल्या तर त्यातून प्रबोधन व अनुकरणीय गोष्टी घडतात या भावनेतून जास्तीत जास्त लोकांपर्यंत समुपदेशनाचे महत्व पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. करीअर मार्गदर्शन, समुपदेशन, व्याख्याने यासाठी त्यांना अवश्य संपर्क करा. मागील रविवारी योगायोगाने त्यांची घडून आलेली भेट त्यांचे विविध पैलू उलगडणारी ठरली. 


वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त