सूडाच्या भावनेने प्रेरित राजकारण
राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून दहशतीच्या जोरावर निवडणुका लढवत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात दररोज शेकडोंच्या संख्येत गुन्हेगारी घटना घडत असतात. त्यातील गुन्हेगारांना बळ देण्याचे वा त्यांना गुन्ह्यातून बाहेर काढण्याचे काम हेच लोकप्रतिनिधी करत असतात. यातील अनेक घटना तर उघडकीसदेखील येत नाहीत इतक्या सराईतपणे दडपल्या जातात. पोलिसांवरील दबाव वा सेटलमेंटदेखील यासाठी कारणीभूत ठरते. मात्र राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांवर होणारे हल्ले लपून राहत नाहीत. त्याचा राजकीय लाभ उचलण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो. कुठलीही घटना घडली की त्याचा थेट संबंध राज्याच्या गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांशी जोडला जातो. सध्याचे राजकीय वातावरण हे सुडाच्या भावनेने प्रेरित आहे. जे पक्ष सत्तेत आहेत तेच विरोधात आहेत. त्यामुळे कार्यकर्ते व मतदार प्रचंड संभ्रमात आहेत. अशावेळी वर्चस्वासाठी एकमेकांवर हल्ले करण्याच्या घटना आगामी काळात घडणार हे निश्चित आहे. पोलिसांची भूमिका यात निःपक्षपाती राहणे अत्यंत महत्वाचे आहे. गुन्हेगार कुठल्याही पक्ष वा संघटनेचा असो, त्याला नियमानुसार कडक शासन करण्यासाठी कुठलीही तडजोड वा दबाव त्यांनी स्वीकारू नये. शस्त्रपरवान्यांचे नियम अधिक कडक करावे लागतील. राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण शांततापूर्ण व कायद्याच्या धाकात राहावे यासाठी पोलिसांनी अतिआत्मविश्वासी लोकप्रतिनिधी व गुन्हेगारांवर वचक ठेवणे काळाची गरज आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment