बस प्रवाशांना मनस्ताप का?
कोपरखैरणे येथून उरणला जाणारी ३१ नंबरची एनएमएमटी बस गेली १५ ते २० वर्षांपासून सुरू आहे. या बसने नियमित प्रवास करणाऱ्या व बसची वाट पाहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. एका बसला अपघात झाला व त्यामुळे स्थानिकांचा रोष पत्करावा लागला म्हणून इतकी वर्षे सुरू असणारी बस सेवा बंद करणे संयुक्तिक वाटत नाही. यामुळे या भागांतून नवी मुंबईत ये जा करणाऱ्या नोकरदारांचे व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. खाजगी प्रवाशी वाहतूक सेवेला फायदा मिळण्यासाठी एनएमएमटीची ही सेवा बंद करण्यात आल्याची शंका घेण्यास नक्कीच वाव आहे. एका बसच्या ड्रायव्हरच्या निष्काळजीपणाचा परिणाम हजारो प्रवाशांना भोगावा लागणे कितपत योग्य आहे याचा विचार परिवहन विभाग व स्थानिकांनीही करायला हवा. नवी मुंबईच्या अनेक दाटीवाटीच्या, अरुंद, रहदारीच्या, बाजारपेठांच्या रस्त्यांवर परिवहन वाहतूक सुरू आहे. यात मोठ्या संख्येने धावणाऱ्या बसेस व इतर वाहनांचा त्रास पादचाऱ्यांना होतोच मात्र त्याचा त्रास वाहन चालवणाऱ्यानाही होत आहे. मात्र परिवहन वाहतूक ही नवी मुंबईकरांच्या सोयीसाठी आहे, तिचा सोयीप्रमाणे वापर करू नये हीच अपेक्षा आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment