सर्वच गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळण्यासाठी भारत सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचे नामांकन पाठवण्यात आलं आहे. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगड या किल्ल्यांचा समावेश आहे. यामुळे निश्चितच या किल्ल्यांना जागतिक ओळख मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेले खरे वैभव राज्यातील गड, दुर्ग, किल्ले हेच आहेत. राज्यात ३९० पेक्षा अधिक किल्ले आहेत. मात्र यातील अनेक गड-दुर्गांची अवस्था आज अत्यंत दयनीय आहे. दुर्गप्रेमी व गिर्यारोहक बऱ्याचदा आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून या किल्ल्यांची डागडुजी करताना दिसतात. गडावर चढण्यासाठी पायवाट तयार करणे, सुचनाफलक लावणे, साफसफाई करणे ही कामे सातत्याने व हिरीरीने त्यांच्यामार्फतच होताना दिसतात. मात्र महाराजांच्या नावाचा व प्रतिमेचा वापर करून वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्यांना मात्र महाराजांच्या गडांच्या दयनीय अवस्थेचा पुळका न यावा हि खरी शोकांतिका आहे. आज प्रत्येक शहरात, जिल्ह्यात महाराजांचे शेकडो पुतळे चौकाचौकांत, रस्त्यारस्त्यावर उभारलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात, हजारो कोटी रुपये खर्चून अरबी समुद्रात भराव करून छत्रपतींचे भव्य स्मारक उभारण्याचीही तयारी आहे. इतकी वर्षे या पुतळे व स्मारकांवर खर्च करण्यात येणाऱ्या पैशाच्या एक टक्का निधी जरी या गड, किल्ल्यांकडे वळवला असता तरी त्यांना राजांच्या काळातील वैभव प्राप्त झाले असते. केवळ पुतळे उभारायचे व त्यांचा राजकीय स्वार्थापायी वापर करायचा इथपर्यंतच महाराजांना सीमित ठेवणाऱ्या संकुचिताना काय म्हणावे? स्मारकांच्या माध्यमातून शिवरायांचा जो इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा तो तर केव्हाच पोहोचला आहे. आज एखाद्या लेखकाने शिवाजी महाराजांबद्दल एखादी नवी माहिती देण्याचा प्रयत्न जरी केला तरी लोक त्याकडे लक्ष न देता पान पलटून पुढे जातात इतका राजांचा इतिहास जनतेला तोंडपाठ झाला आहे. त्यामुळे कृत्रिमरीत्या बनवलेल्या स्मारकांमध्ये हा इतिहास बंदिस्त करण्यापेक्षा महाराजांची कर्मभूमी असलेल्या किल्ल्यांवर संग्रहालये व माहितीकेंद्रे बनवावी. यामुळे पर्यटकांना व शिवप्रेमींना प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन राजांची महती अभ्यासल्याची अनुभूती मिळेल व अधिक प्रभावीपणे इतिहास लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे हजारो कोटींची स्मारके उभारण्याअगोदार त्यासाठी लागणारा निधी गड किल्ल्यांच्या संवर्धनावर खर्च झाला तर रयतेला व महाराजांच्या असंख्य 'मावळ्यांना' समाधान वाटेल. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत ११ किल्ल्यांचा समावेश होईलच मात्र हिंदवी स्वराज्यामध्ये महाराजांच्या पराक्रमाची खरीखुरी साक्ष देणाऱ्या इतर गडकिल्ल्यांना गतवैभव कधी प्राप्त होणार?



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा