घणसोलीतील वैभवशाली सोसायटीस २५ वर्षे पूर्ण

नवी मुंबई - घणसोली नवीन वसाहत येथील सर्वात जुन्या वैभवशाली गृहनिर्माण सोसायटीमध्ये, सोसायटी स्थापनेस पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सत्यनारायण महापूजा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. घणसोली सेक्टर १ येथील वैभवशाली को ऑप हौसिंग सोसायटी ही या नोडमधील सर्वात अगोदरची व जुनी सोसायटी समजली जाते. १९९९ साली स्थापन झालेल्या ह्या सोसायटीस तब्बल २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या ह्या सोसायटीत एकूण ४८ कुटुंबे वास्तव्य करत आहेत. एकाच कार्यालयात काम करणाऱ्या ह्या सोसायटीतील सभासदांचे एकमेकांशी कौटुंबिक ऋणानुबंध असून अनेक उपक्रम सोसायटीत उत्साहात साजरे केले जातात. पंचवीसाव्या वर्षपूर्तीनिमित्त रविवारी सकाळी सत्यनारायण महापूजा संपन्न झाली तर सायंकाळी सभासद व लहान मुलांसाठी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी सोसायटीतील मुलांनी आपले कलागुण सर्वांसमोर सादर केले. त्यानंतर ह्या स्पर्धांचा तसेच अयोध्या येथील श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त सोसायटीत आयोजित रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या दरम्यान सोसायटीच्या जडण घडणीत योगदान दिलेल्या व बाजार समितीतून सेवा निवृत्त झालेल्या श्री खंदारे, श्री पाटील, श्री कुंभार, श्री गोडसे, श्रीमती पाटील ह्या सोसायटी सभासदांचा सत्कार करण्यात आला. पूजेनिमित्त सायंकाळी महाप्रसादाचे आयोजनदेखील करण्यात आले होते. सोसायटीच्या आजवरच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या तसेच नव्याने दाखल झालेल्या सर्व सभासदांचे याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष श्री बी. बी. गिरी व सचिव श्री व्ही. के. परब यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वैभवशाली मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतले. 


वैभव पाटील

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा