मुंबईतील एसबीआय ग्रीन मॅरेथॉन मध्ये 'आभा कार्ड'बाबत जनजागृती

मुंबईतील एसबीआय ग्रीन मॅरेथॉन मध्ये 'आभा कार्ड'बाबत जनजागृती
"निरोगी आणि हरित मुंबई"चा नारा देत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने मुंबई तसेच भोपाळ शहरांमध्ये "ग्रीन मॅरेथॉन" चे आयोजन रविवार दिनांक १७ मार्च २०२४ रोजी करण्यात आले. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या ह्या मॅरेथॉन मध्ये पहाटेपासूनच हजारो मुंबईकर सहभागी झाले होते. ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अशा तीन टप्प्यांमध्ये पार पडलेल्या मॅरेथॉनमधील महिला व पुरुष गटातील आणि १८-४४ वर्षे तसेच ४५ वर्षावरील वयोगटातील विजेत्यांचा सन्मान यावेळी रोख पारितोषिके व भेटवस्तू देऊन करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर एसबीआयचे वरिष्ठ अधिकारी तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण नवी दिल्लीचे एबीडीएम संचालक मा श्रीमती लथा गणपती तसेच मा श्री विक्रम पगरिया आदी मान्यवर उपस्थित होते. यंदा प्रथमच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणने या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेत आयुष्यमान भारत डिजिटल मिशन व आभा कार्डबाबत लोकांमध्ये जनजागृती केली. आभा कार्डच्या माध्यमातून नागरिकांचा संपूर्ण आरोग्य रेकॉर्ड एका ठराविक क्रमांकाच्या आधारे जतन करता येत असून भविष्यातील आरोग्याची गुंतागुंत व उपचार या आभा क्रमांकामुळे सहज शक्य होऊन जातात. तसेच देशाच्या कुठल्याही भागात, कुठल्याही रुग्णालयात उपचार घेताना रुग्णाचा संपूर्ण आरोग्य इतिहास आभा कार्डद्वारे उपलब्ध होत असल्यामुळे उपचारात गती व अचूकता येते व रुग्ण व्यवस्थेलाही उपचारात बाधा येत नाही. त्यामुळे उज्वल व निरोगी आयुष्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर आभा कार्ड तयार करून घ्यावे असे आवाहन याप्रसंगी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यावेळी डॉ विजय बाविस्कर, डॉ सरिता हजारे, डॉ नीलिमा सोनवणे, श्री सुभाष बोरकर, डॉ राम हंकारे, डॉ दुर्योधन चव्हाण, डॉ फडणीस, डॉ माधुरी माथुरकर इत्यादी अधिकारी देखील निरोगी व ग्रीन मुंबईचा नारा देत मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते. प्राधिकरणातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसमेवत केंद्र व राज्य आरोग्य विभागातील जवळपास ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांनीदेखील मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आणि आभा कार्ड तयार करण्याचे अप्लिकेशन डाउनलोड करण्याचा बारकोड छापलेले टी शर्ट परिधान करत जनजागृती केली व त्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकेही उपस्थितांना वितरित केली. सध्याच्या प्रदूषित वातावरणात व जंक फूड च्या जमान्यात आरोग्य व फिटनेस जतन करणे लोकांसाठी जिकिरीचे बनत चालले असून मुंबईमध्ये पार पडणाऱ्या अशा मॅरेथॉनच्या माध्यमातून काही प्रमाणात शरीराला योग्य व्यायाम मिळत असल्याचे मत सहभागी मुंबईकरांनी व्यक्त केले. मॅरेथॉन ही केवळ स्पर्धा नसून मुंबईकरांची निरोगी आयुष्याची खरी गरज बनत चालल्याचेदेखील या स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून दिसून आले. 


वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त