गावाकडची होळी

होळी सणाच्या  निमित्‍ताने यंदाही पालघर जिल्‍हयातील देवघर या जन्‍मगावी जाण्‍याचा योग आला. गावातील होळीची परंपरा कित्येक वर्षे जुनी असून आजही एकाच ठिकाणी जमून गावातील सर्व ग्रामस्‍थ होळीदहन करतात. लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत चार पाचशे ग्रामस्थ यावेळी एकत्र जमतात. गावातील मध्यस्थानी असलेल्या एका शेतात अनेक दशकांपासून होळी दहनाचा हा प्रघात सुरू आहे. दरवर्षी गावच्या पोलीस पाटलांकरवी  अगदी शास्त्रोक्त पद्धतीने होळीचे पूजन केले जाते. गावातील सर्व महिला वर्ग यावेळी आरती ताट, नारळ वगैरे साहित्य घेऊन पूजेसाठी आवर्जून हजर असतो. पूजा झाल्यावर सामुदायिक महा आरती व त्यानंतर होळीला अग्नी देण्यात आला. गावातील अनेक नवविवाहित जोडपी यावेळी होळीला फेरे मारून आशीर्वाद घेताना दिसली. दुसरीकडे काही हौशी तरुणांकडून जोरदार आरोळ्या आणि बोंबा सुरू होत्या. होळीच्या मध्यभागी असलेला बांबूचा मध्यखांब पडल्याशिवाय कुणीही होळीजवळून निघाला नाही. या बांबूच्या फांद्या घराच्या दरवाजावर लावण्याचा प्रघात आहे त्यामुळे घरात अनिष्ट घटना, वीज, बाधा पोहोचत नाही असा समज दृढ आहे. नोकरी व्‍यवसायानिमित्‍त बाहेरगावी राहणारे अनेक जुने मित्र या निमित्‍ताने एकत्र भेटले. एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देत मग होळी जवळच गप्पांचे फड रंगले. रात्री उशिरापर्यंत गप्पांची ही मैफील सुरू होती. दूसरा दिवस धुळवडीचा. सकाळी पुन्हा एकदा गावातील तरुण एकत्र जमले. एका शेतात मातीचा चिखल करण्यात आला व त्यात एकमेकांना माखवुन हा धुलिवंदनाचा उत्सव साजरा केला गेला. ना कुठला रंग ना पाणी, थेट मातीच्या चिखलातच अशा प्रकारे धुळवड साजरी करण्याचा अनोखा आनंद फक्त गावातच मिळतो. अगदी लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच या मातीचा आस्वाद दिला जातो. महिलावर्ग देखील रंगपंचमीचा हा सण साजरा करण्यात कुठेही कमी नसतो. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे गावाजवळील एका नदीवर जाऊन दुपारचे जेवण तरुण मंडळींनी बनवले व पोहोण्याबरोबरच सहभोजनाचा आनंद घेत या सणाचा समारोप केला. होळीच्या निमित्ताने अनेक वर्षे जुनी परंपरा अनुभवण्याचा तसेच एरव्ही अपवादानेच भेटणाऱ्या गावातील जवळपास सर्वच जुन्या मित्र मंडळींना भेटण्याचा योग येत असल्याने गावाकडचा होळीचा हा सण हवाहवासा वाटतो.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त