आधार बेस मतदान घ्या

यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. एकापाठोपाठ लोकसभा, विधानसभा व त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका राज्यात होणार आहेत.  पारंपरिक पद्धतीच्या मतपत्रिकांद्वारे होणाऱ्या मतदानप्रक्रियेत काळानुरूप बदल घडून आला आणि मतपत्रिकांची जागा ईव्हीएम मशीन सारख्या अद्ययावत यंत्रांनी घेतली. मात्र असे असले तरी दरवेळी शिक्षक, ग्रामसेवक व इतर विविध खात्यांतील सरकारी कर्मचारी सर्वेक्षण, प्रशिक्षण व निडणुकांच्या कामांमध्ये जुंपले जातात. यामुळे त्यांच्या मूळ कामकाजावर परिणाम होतो ही तक्रार खरी आहे. आता तर ईव्हीएम मशिन्सवर अनेक शंका उपस्थित करण्यात येत असल्यामुळे कालांतराने या मशीनही कालबाह्य होतील हे नाकारता येणार नाही. त्यामुळे मतदार नोंदणी व मतदान प्रक्रियेत पारदर्शकता येणे फार गरजेचे आहे. आज सर्वत्र आधार कार्ड सक्तीचे केले जात असताना याच आधार क्रमांकाचा वापर मतदान प्रक्रियेत का केला जात नाही हा मोठा प्रश्न आहे. बँकांमधील खाती, पॅन कार्ड, सिम कार्ड काढण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य असून केवळ बोटांच्या ठशांद्वारे त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती व इतिहास ऑनलाईन उपलब्ध होते जीचा वापर त्या व्यक्तीच्या अधिकृत ओळखीसाठी केला जातो. त्यामुळे इतर कोणत्याही पुराव्याची व कागदपत्रांची गरजच भासत नाही. मतदान केंद्रांवर आधार क्रमांकाद्वारे मतदारांची ओळख पटवण्यासाठी यंत्रणा उपलब्ध केली तर बोगस, दुबार व मयत व्यक्तींचे होणारे मतदान संपूर्णतः बंद होईल हा विश्वास यंत्रणांसह राजकीय पक्षांना का वाटत नाही हे एक मोठे कोडे आहे. आणि महत्वाचे म्हणजे आधार बेस मतदान केल्यास सरकारी यंत्रणा कामाला लावण्याऐवजी टीसीएस, आयबीपीएस, आयआयटी यासारख्या प्राधिकृत खाजगी संस्थांमार्फत त्याच खर्चात निवडणुकीचे काम करून घेता येईल व विविध खात्यांचे नियमित कामकाज कर्मचाऱ्यांअभावी खोळंबणार नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत एकदा 'आधार बेस मतदान' ही संकल्पना राबवण्यास काय हरकत आहे?



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त