विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल ही मोठी समस्या
विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल आज सर्वात मोठी समस्या बनू पाहत आहे. शाळा महाविद्यालयातील बहुतांश मुलांना मोबाईलचे व्यसन जडलेले आहे. यामुळे स्टडी टाईम कमी होऊन स्क्रीन टाईम वाढत चाललेला आहे. कोविड काळात शाळा महाविद्यालये बंद होती मात्र मोबाईलच्या माध्यमातुन ऑनलाईन शिक्षण सुरू होते. मोबाईल न वापरणारी मुलेदेखील या काळात मोबाईल वापरू लागली. मात्र काळाची गरज म्हणून हातात आलेले मोबाईल आज मुलांचे व्यसन बनलेले आहे आणि त्यांचे शैक्षणिक करिअरदेखील त्यामुळे खराब होत आहे. हातोहाती असलेले अँड्रॉईड मोबाईल व त्यामध्ये सहज उपलब्ध होणारे इंटरनेट, तसेच व्हाट्सएप व फेसबुकमुळे देशातील तरुण पिढी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मोबाईल नव्हते तेव्हा मुले पुस्तकाजवळ होती आता मुले मोबाईलमध्येच स्वतःचे विश्व शोधू लागलीत. पालकांची मोबाईलमधील व्यस्तता देखील मुलांना बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे. व्यस्त जनजीवन, मोबाईलच्या किंमतीत झालेली घट व वाढलेला दर्जा, जागोजागी वाय फाय सारख्या सुविधा, मोबाईलद्वारे होत असणारे सुलभ आर्थिक व कार्यालयीन व्यवहार व त्यामुळे वाचणारा वेळ तसेच मोबाइलवर व्हिडिओ पाहण्याचा वाढत असलेला नाद यामुळे बहुतांश लोक सदासर्वदा मोबाईल मध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. याचा विपरीत परिणाम मुलांवर होऊन तीदेखील मोबाईलच्या आहारी जात आहेत. यामुळे मानसिक आजार बळावण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण आणणे गरजेचे असून यासाठी पालक व शैक्षणिक संस्थांची भूमिका फार महत्वाची आहे. शालेय आयुष्यात मुलांना केवळ गरजेपुरता मोबाईल उपलब्ध करून देणे ही पालकांची जबाबदारी आहे. तसेच शाळा महाविद्यालयांच्या परिसरात मोबाईल वापरावर निर्बंध आणून मोबाईल वापराचे दुष्परिणाम मुलांना सांगण्याची व त्यांचे प्रबोधन करण्याची भूमिका शैक्षणिक संस्थानी चोख वठवायला हवी. येणारी भावी पिढी मोबाईलच्या अतिरेकाने उध्वस्त होण्यापासून वाचवायची असेल तर विद्यार्थ्यांना मोबाईल ऐवजी पुस्तकांची आवड निर्माण करावी लागेल.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment