जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने

८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा होत आहे. महिला सक्षमीकरणाचा गजर सर्वत्र सुरु आहे. मात्र महिलांचे समाजातील स्थान, त्यांची सुरक्षितता, समानता, अधिकार, क्षमता, आरोग्य या बाबी स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षानंतरदेखील चिंताजनक आहेत हे मान्य करावेच लागेल. देशाच्या कुठल्यातरी दररोज भागात महिलांवर दररोज अत्याचार, बलात्कार, अन्याय या गोष्टी घडत आहेत, त्यांच्या सुरक्षेचा विषय आजही अनुत्तरीतच आहे. कोणतेही सरकार यावर ठोस उपाय शोधू शकलेले नाही. महिलांसाठी केवळ आरक्षणे देऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी लोकांची स्त्रीकडे पाहण्याची मानसिकता बद्दलायला हवी, त्यांना सामाजिक सुरक्षा बहाल करण्यासाठी कायद्यामध्ये कठोरता आणणे आवश्यक आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचे अनेक खटले वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित आहेत. असे खटले जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कडक शासन दिले पाहिजे जेणेकरून स्त्रियांप्रति समाजाचा दृष्टिकोन बद्दलेल. कायद्याचा धाक प्रस्थापित करणे काळाची व स्त्री सुरक्षेची सर्वात मोठी गरज आहे. स्त्री भ्रूण हत्येसारखे पातक करणाऱ्या अपप्रवृत्तीना जागीच ठेचून काढले पाहिजे, त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे लावून आयुष्यभराची अद्दल घडविली पाहिजे. आजही गर्भलिंगनिदानाचे प्रकार समाजात उघडकीस येत आहेत, जागृत नागरिकांनी हे प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले पाहिजेत. मुलींचा जननदर कमी असण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूण हत्येचा आहे. आरोग्याच्या बाबतीत स्वतःची काळजी महिलांनीच घ्यायला हवी. कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या व नोकरी व्यवसाय सांभाळून संसाराची जबाबदारी पेलणाऱ्या महिलांनी स्व-आरोग्याच्या बाबतीतदेखील दक्ष राहायला हवे. स्वसंरक्षणाचे धडे, अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महिलांनीच आज जागृत राहण्याची गरज आहे. स्त्रीने आपली दुर्बलता झटकून स्वतःची क्षमता ओळखण्याची वेळ आलेली आहे. स्त्री पुरुष समानतेचा नारा देत असताना आजदेखील आपल्याला महिला दिनाचा गजर करावा लागत असेल तर ते पुरुषप्रधान संस्कृतीच समाजात वरचढ असल्याचे मान्य करण्यासारखे आहे. यामुळे जागतिक महिला दिनाचे महत्व केवळ एका दिवसापुरते न ठेवता प्रत्येक दिवशी महिला सशक्तीकरणासाठी समाजातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त