तर आप वेगळेपण गमावून बसेल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आम आदमी पार्टी हा मुळात प्रामाणिकता, पारदर्शकता, लोकाभिमुखतेच्या तत्वांवर दोन राज्यांमध्ये सत्तेवर बसलेला आहे. केजरीवाल हे अत्यंत हुशार, तत्वनिष्ठ, इमानदार, दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांच्या पक्षातील मंत्री, नेते व कार्यकर्तेही सुज्ञ, सुशिक्षित व जबाबदार घटक म्हणून परिचित आहेत. राजकीय हेवेदावे, डावपेच व घराणेशाहीपासून दूर असलेल्या ह्या पक्षाने गेल्या काही काळापासून सत्ताकेंद्रातील भाजपविरोधी इंडिया आघाडीत सामील होत देशाच्या राजकीय धुराळ्यात सक्रिय सहभाग घेतलेला आहे. कुठल्याही राजकीय आरोप प्रत्यारोपांत न पडता केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवणाऱ्या आप ची ही बाजू जरा खटकणारी आहे. स्वकेंद्रित व विकासात्मक राजकारणामुळे दिल्ली व पंजाबमध्ये मतदारांनी सत्तेत बसवलेल्या आपने घराणेशाहीपासून नेहमीच दूर राहत राजकारणातील आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे. मात्र सध्या तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या जागी त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री बनवण्याची आपची रणनीती त्यांच्या अंगलट येऊ शकते. आजवर राजकारणातील आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या केजरीवाल यांनी भाजपविरोधी राजकीय पक्षांच्या आघाडीसोबत जात राजकीय सुंदोपसुंदीत सामील होण्याचा घेतलेला निर्णय व आता त्यांच्या जागी त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री बनवण्याचा सुरू असलेला प्रयत्न आप ची वाटचाल व आजवरचे वेगळेपण याला गालबोट लावणारा ठरेल एव्हढे नक्की. 


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त