शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी पुण्यात सन्मान - राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय

शैक्षणिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये काल रविवारी सन्मानित होण्याचा योग आला. निमित्त होते साई कला आविष्कार नाट्य संस्था  व श्रीमती चंद्रकला गोयल प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने 'भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत' या विषयावर खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२४ तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी चांद्रयान ३ चित्र रंगभरण स्पर्धा. ह्या दोन्ही स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा चिंचवड (पुणे) येथील सायन्स पार्क ऑडिटोरियम येथे रविवार दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ वाजता संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांच्या शुभहस्ते स्वीकारले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर, उद्योजक बसवराज कल्लोळी, माजी सीनियर मॅनेजर टाटा मोटर्स रमाकांत आडके, मराठी विभाग प्रमुख महात्मा फुले महाविद्यालय प्राध्यापक डॉ. प्रा. पांडुरंग भोसले, मॉर्डन महाविद्यालय पुणे प्रा.डॉ.रुपेश बनसोडे, जयहिंद इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य डॉ.किरण पैठणकर आणि साई कला आविष्कार नाट्य संस्थेचे अध्यक्ष व आयोजक प्रा राजेंद्र सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यातील विविध शाळा - महाविद्यालयांतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, कलाशिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षाला पाणी घालून व वृक्षपूजन करून पर्यावरणाचा संदेश देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी चांद्रयान चित्र रंगभरण स्पर्धेतील निवडक चित्रप्रदर्शन देखील भरवण्यात आले होते. सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतांमध्ये संघर्षातून कश्या पद्धतीने यश मिळवले हे सांगताना अपयशाने खचून न जाण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. अध्यक्षीय भाषणात सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ नगरकर यांनी आपल्या सेवाकाळातील विविध अनुभव कथन करत अंतराळ मोहिमांमधील अनेक बारकावे समजावून सांगितले. चांद्रयान ३ या मोहिमेचा उद्देश, सफलता याबाबतही त्यांनी भाष्य करत या मोहिमेतून भारताची आंतराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढल्याचे विषद केले. मुलांनी विद्यार्थी दिशेतच छोट्यामोठ्या समस्यांतून निरनिराळे शोध लावण्याचा प्रयत्न करायला हवा असा सल्ला देत त्यासाठी काही उदाहरणेही दिली. मुलांना पडलेल्या प्रश्नांचे समाधान करत त्यांचेशी मुक्त संवाद साधला. डॉ नगरकर यांना दोन मुली असून त्यादेखील उच्च पदांवर कार्यरत आहेत. आपले सहकारी आपल्या मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवत असताना डॉ नगरकर मात्र आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्याच देशासाठी करण्यासाठी दोन्ही मुली भारतातच कार्यरत असल्याचे मोठया अभिमानाने सांगतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राजेंद्र सोनावणे यांनी केले. विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कोणताही सन्मान, सत्कार, पुरस्कार हा प्रेरणा, उमेद, अधिक काम करण्यासाठी उर्जा आणि लोकमान्यता देऊन जातो. आजवर साहित्य व लेखन क्षेत्रात अनेक ठिकाणी, अनेक पुरस्कार प्राप्त झाले असले तरी पुणे नगरीत प्राप्त झालेल्या ह्या सन्मानाचा विशेष आनंद आहे. 

वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त