जागतिक सुरक्षित मातृत्व दिन
११ एप्रिल - जागतिक सुरक्षित मातृत्व दिन
११ एप्रिल हा जागतिक सुरक्षित मातृत्व दिन म्हणून साजरा केला जातो. माता व बालकांचे निरोगी व सुदृढ आयुष्य आज प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने प्राधान्याचा विषय आहे. कोरोनासारख्या जागतिक संक्रमणकाळात तर कौटुंबिक आरोग्य अबाधित राखणे आपल्या सर्वांसाठी अत्यंत आवश्यक झाले असुन आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात निरोगी व सुदृढ शरीराचे महत्व अधोरेखीत झाले आहे. शासनाकडून माता व बाल आरोग्यविषयक अनेक योजना राबिवण्यात येत आहेत ज्यामध्ये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष्य, नियमित लसिकरण, पल्स पोलिओ मोहिमा, जननी सुरक्षा योजना, नवजात शिशु उपचार, माहेर घर योजना यासारख्या आरोग्य योजनांचा समावेश होतो. माता बाल आरोग्य विषयक कार्यक्रमांमुळे राज्यातील माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाणदेखील गेल्या काही वर्षांपासुन आटोक्यात आलेले आहे. गर्भवती महिलेचे आरोग्य, आहार या बाबी सुदृढ बालकासाठी खूप गरजेच्या आहेत. बाल मृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे गेल्या काही वर्षाच्या केंद्र सरकारच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. केंद्र शासनाच्या २०१८ च्या एसआरएस अहवालानुसार महाराष्ट्राचा अर्भकमृत्यू दर हा प्रति १००० जन्मामागे १९ असा होता, त्यात घट होऊन सन २०२० च्या एसआरएस अहवालानुसार हा १६ झाला आहे. तसेच सन २०२०च्या एसआरएस अहवालानुसार राज्याचा नवजात मृत्यू दर हा ११ असून महाराष्ट्राने शाश्वत विकास ध्येयाचे नवजात मृत्यू दर १२ पेक्षा कमी करण्याचे लक्ष्य गाठलं आहे. राज्यातील जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि काही उपजिल्हा रुग्णालयांत नवजात शिशु कक्ष म्हणजे एसएनसीयूची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यात एकूण ५३ एसएनसीयू कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या ठिकाणी बाळ जन्मल्यानंतर बाळाचे वजन कमी असल्यास, काविळ झाली असल्यास किंवा त्याला इतर कोणताही त्रास असल्यास बाळाला एसएनसीयू कक्षामध्ये दाखल करुन उपचार केले जातात. राज्यात मागील वर्षभरात जवळपास ६० हजार बालकांवर एसएनएसीयुमध्ये उपचार करण्यात आले. राज्यातील लहान बालके, किशोरवयीन मुले आणि मुली, गर्भवती आणि स्तनदा मातांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषण अभियानांतर्गत ॲनिमिया मुक्त भारत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सहा महिने ते ५९ महिने आणि ५ ते ९ वर्ष या वयोगटातील बालकांना, १० ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींना, गर्भवती, स्तनदा माता आणि प्रजननक्षम वयोगटातील स्त्रीया यांना लोह आणि फॅालिक ऑसिड या औषधाची प्रतिबंधात्मक पूरक मात्रा देण्यात येते. तसेच रक्तक्षय असलेल्या लाभार्थ्यांना आवश्यक उपचार आणि संदर्भ सेवा देण्यात येते. राज्यातील नवजात शिशु आणि अर्भक मृत्यू कमी करण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येतो. आशांमार्फत करण्यात येणा-या गृहभेटी दरम्यान जंतुसंसर्ग, न्युमोनिया, हायपोथर्मिया, ताप, स्तनपान समस्या, अतिसार, कमी दिवसाची बालके, कमी वजनाची बालके, डोळयाने दिसणारे जन्मजात व्यंग अशी बालके आढळल्यास नवजात शिशुंना जवळच्या शासकिय आरोग्य संस्थेत संदर्भित करण्यात येते. गृहभेटी दरम्यान पोषण, आरोग्य, प्रारंभिक बालपणातील विकास आणि वैयक्तिक आणिपरिसर स्वच्छता या चार प्रमुख बाबींवर भर देण्यात येतो.
गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी त्यांना प्रोत्साहित करुन गर्भवती महिला व जन्माला येणा-या प्रत्येक नवजात बालकाचे आरोग्य सुधारण्यासाठी व राज्यातील मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात राहावा यासाठी केंद्र शासनाच्या सहयोगाने 'प्रधानमंत्री मातृवंदना योजना' सन २०१७ पासुन राज्यभरात राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागामध्ये आजही महिलांच्या प्रसुती व प्रसुतीपश्चात घ्यावयाच्या काळजीबाबत उदासिनता व सरकारी योजनांबाबतची अनभिज्ञता प्रसुतीप्रक्रियेतील क्लिष्टता वाढवते. ग्रामीण भागातील गरीब गर्भवती महिलांना गर्भधारणेपासुन अखेरच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी कष्टाचे काम करावे लागते. तसेच प्रसुतीनंतर शरीर साथ देत नसतानाही मेहनतपर कामे करावी लागतात. अशा परस्थीतीत त्यांचे आपल्या आरोग्याकडे व पोषणाकडे कमालीचे दुर्लक्ष होते व त्याचा विपरित परिणाम गर्भावर व नवजात बालकावर होतो. यामुळे मातेबरोबर नवजात मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे, गर्भवती व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहीत करुन जन्माला येणा-या नवजात बालकांचे आरोग्यदेखील उत्तम राहावे यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने 'प्रधानमंत्री मातृ वंदना योजना' राबविण्याचा निर्णय घेतला व ही योजना राज्यात आरोग्य विभागामार्फत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. प्रसुतीकाळात माता व बालकांचे आरोग्य सुधारावे व राज्यातील माता व बालमृत्यूच्या घटनांमध्ये घट व्हावी हा मुख्य उददेश या योजनेचा आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी शासनाने अधिसुचित केलेल्या आरोग्य संस्थेत गर्भवती महिलांना नोंदणी करणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थी महिलेस रु.५०००/- एवढी रक्कम आधार संलग्नं बॅंक खात्यात किंवा पोस्ट ऑफीसमधील खात्यात (DBT) जमा करण्यात येत आहे. हया योजनेंतर्गत एकवेळ आर्थिक लाभ मिळणार असुन पहिल्या जिवीत अपत्यापूरती मर्यादित आहे. या योजनेत दारिद्रयरेषेखालील व दारिद्रय रेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणा-या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही. गर्भवती महिलांचे आरोग्य हे सुदृढ व सशक्त बालके जन्माला येण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न शासनाच्या वतीने करण्यात येत असुन कुटुंब कल्याण व माता- बाल आरोग्य हा सशक्त भारतासाठी प्राधान्याचा विषय आहे. माता व बालकांच्या निरोगी आयुष्यासाठी अनेक योजना आज शासन स्तरावर राबविण्यात येत आहेत. 'प्रधान मंत्री मातृ वंदना' योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील गर्भवती महिलांना आर्थिक हातभार लागत असुन ज्यायोगे प्रसुती काळात अर्भक व नवजात बालकांचे पोषण चांगल्या - प्रकारे करण्यास त्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे. जागतिक सुरक्षित मातृत्व दिनाच्या निमित्ताने महिलांच्या प्रसुतीकाळातील प्रश्नांवर विचारमंथन होणे गरजेचे आहे. बदलती जिवनशैली व वाढत्या कौटुंबिक जबाबदा-यांच्या पार्श्वभुमीवर काम व्यवसायानिमित्त मोठया महिला घराबाहेर पडत आहेत. कामाची दगदग व कौटुंबिक जबाबदा-यांच्या पार्श्वभुमीवर महिलांचे आरोग्य हा विषय अत्यंत गहन व चिंतेचा झालेला आहे. त्यात महिलांचा प्रसुतीकाळ व त्यादरम्यान उचित काळजी घेणे या गोष्टी प्राधान्याच्या आहेत. सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील महिलांच्या बाबतीत यासंदर्भात विचार होणे फार गरजेचे आहे. यासाठी गरोदर मातांच्या आरोग्यासाठी शासन स्तरावरुन सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत योग्य जनजागृती झाली तर त्याचा लाभ अधिकाधिक गरजुंना नक्कीच होईल. यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था व समाजातील जागरुक घटकांचे योगदान तितकेच मोलाचे आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment