एकत्रित परिवहन सेवा चालवण्याचा निर्णय चांगला
भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या शहरांसाठी एकत्रित परिवहन बससेवा चालवण्याचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. ह्या सर्वच शहरांची अंतर्गत वाहतूक सेवा फारशी मजबूत नाही. तसेच यातील एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी एसटी, रेल्वे, खाजगी वाहतूकदेखील उपलब्ध असली तरी त्यासाठी प्रचंड आटापिटा करावा लागतो. यात शारीरिक, मानसिक व आर्थिक ताण लोकांवर मोठया प्रमाणावर पडतो. एकत्रित वाहतूक सुरू झाल्यास लोकांची दगदग, त्रास, वेळ व खर्चदेखील बऱ्यापैकी वाचेल. मुंबईतील बेस्ट, नवी मुंबईतील एनएमएमटी व ठाण्यातील टीएमटी परिवहन सेवादेखील या शहरांना जोडल्यास रेल्वे व इतर वाहतूक सेवांवरील भार हलका होईल असे वाटते. बस सेवांची सहज उपलब्धता, वारंवारता तसेच अधिकाधिक मोक्याच्या ठिकाणी थांबे ठेवल्यास त्याचा लाभ नक्कीच उपनगरवासीयांना होईल. तसेच या सेवेमुळे खाजगी वाहतुकीने होणारी वाहतूक कोंडी व प्रदूषणही कमी होईल अशी आशा आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment