आधुनिक पिढीला संस्कारांच्या कक्षेत आणण्यासाठी बाल संस्कार शिबिरे उपयुक्त

पालघर जिल्ह्यात बाल संस्कार शिबिरांचे आयोजन
शाळांना लागणा-या मे महिन्‍यातील सुटटयांचे निमित्‍त साधुन सालाबादप्रमाणे यंदाही पालघर जिल्‍हयातील विविध ठिकाणी बाल सुसंस्‍कार शिबीरांचे आयोजन करण्‍यात आले आहे. बाल संस्‍कार वारकरी शिक्षण संस्‍था, देवघर यांच्‍या वतीने सोमवार दिनांक १ मे ते १८ मे २०२४ या कालावधीत भव्‍य बाल संस्‍कार निवासी शिबीराचे आयोजन वाडा तालुक्‍यातील देवघर गावी करण्‍यात आले आहे. आजच्‍या मोबाईलच्‍या व विज्ञान युगामध्ये तरुण पिढी ही आपले आई वडिल, बहिण भाऊ व गुरुजन यांच्‍या आदरापासुन दुरावत चाललेली आहे. कारण कुटुंबे ही धनाने श्रीमंत झाली पण संस्काराची श्रीमंती गमावून बसली आहे. कामधंदयाच्‍या व्‍यापामुळे आज पालकांना मुलांकडे लक्ष देण्‍यास वेळ नाही.  विभक्‍त कुटुंब पध्‍दतीमुळे वडिलधा-यांच्‍या संस्‍कारांपासुनही अनेक कुटुंबांतील मुले दुरावत चाललेली आहेत. संस्‍कार चांगले असतील तर संतती चांगली होईल. संस्‍कारक्षम संतती निर्माण होण्‍यासाठी प्रथम लहान मुलांवर संस्कार होणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. याच उदात्‍त हेतुने देवघर पंचक्रोशीतील परमार्थिक हेतू जोपासणा-या हभप पांडुरंग म. भोईर यांच्‍या पुढाकाराने देवघर गावातील के.जी.पाटील विदयालय येथे या बाल सुसंस्‍कार शिबीराचे आयोजन सलग ७व्‍या वर्षी करण्‍यात आले आहे. या शिबीरात जवळपास १०० मुले सहभागी होत असुन शिबीरादरम्‍यान आचरण व अध्‍यात्मिक संस्‍कारांबरोबरोबच योगासने, सूर्यनमस्कार, टाळ, पकवाज, पेटी, अभंग, हरिपाठ, हनुमान चालीसा, गीता, विष्णुसहस्त्रनाम इत्‍यादी मुलांना शिकविल्‍या जाणार आहेत. गेली ७ वर्षे या ठिकाणी या बाल संस्‍कार शिबीरासाठी परिसरातील मुले, मालक, ग्रामस्‍थ व दानशूर व्‍यक्‍तींचा अत्‍यंत मौलिक योगदान मिळत असल्‍याचे आयोजक हभप पांडूरग म भोईर यांनी सांगितले. अशाच प्रकारचे बाल संस्‍कार शिबीर श्री ज्ञानोबा तुकोबा सत्संग सेवा संस्था, आळंदी सारशी (वाडा) यांच्‍या वतीने हभप राजेश महाराज बांगर यांच्‍या माध्‍यमातून गांधरे, वाडा येथील कुणबी समाज सभागृह येथे सलग ४थ्या वर्षी दिनांक ४ मे ते १७ मे २०२४ या कालावधीत संप्‍पन्‍न होत आहे. आजच्‍या मोबाईलच्‍या युगात संस्‍कारक्षम पिढी घडवण्‍यासाठी बाल संस्‍कारांची नितांत गरज असुन त्‍यासाठी पालकांचे योगदान व इच्‍छाशक्‍ती फार महत्‍वाची असल्‍याचे हभप राजेश म बांगर यांनी सांगीतले. या निवासी शिबिरातदेखील मुलांना अध्‍यात्‍मीक ज्ञानासोबतच संस्‍कारांचे धडे देण्‍यात येणार आहेत. त्‍याचप्रमाणे सातीवली, मनोर येथे आखिल वारकरी संतसेवा प्रतिष्‍ठान यांच्‍या माध्‍यमातून हभप प्रभुराम म पाटील यांनी दिनांक १ मे ते १५ मे २०२४ या कालावधीत निवासी वारकरी बालसंस्‍कार शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. शिबीरामध्‍ये गीतापाठ, हरिपाठ, गायन, वादन, कवायत, बोधकथा, मैदानी व पारंपारिक खेळ इत्‍यादी विषय शिकवले जाणार आहेत. आपल्‍या परमार्थिक वाटचालीचा वारसा पूढे न्‍यायचा असेल तर आपल्‍या मुलांना बाल संस्‍कारांसारख्‍या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून लहान वयातच योग्य ते धडे गिरवायला हवेत असे मत हभप प्रभुराम पाटील व्‍यक्‍त करतात. एकंदरीत ग्रामीण भागात उन्‍हाळी सुटटयांमध्‍ये सुरु झालेला बाल सुसंस्‍कार शिबीरांचा हा सिलसिला पाश्‍चात्‍य संस्‍कृतीचा अंगीकार करत असलेल्‍या आजच्‍या पिढीला संस्‍कारांची नवी दिशा दाखवणारा ठरत आहे.


वैभव मोहन पाटील

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त