बाल संस्कार शिबिरांना भेट
जॉय ऑफ गिव्हींग सामाजिक संस्थेची पालघर जिल्ह्यातील बाल संस्कार शिबिरांना भेट
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील देवघर व गांधरे गाव येथे आयोजित करण्यात आलेल्या निवासी बाल संस्कार शिबिरांना मुंबईतील जॉय ऑफ गिव्हिंग या सामाजीक संस्थेच्या सभासदांनी शनिवारी भेट दिली. शाळेतील मुलांसाठी उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात दरवर्षी ह्या शिबिरांचे आयोजन केले जाते. या सुट्ट्यांमध्ये मुलांवर अध्यात्मिक संस्कार व्हावेत या हेतूने देवघर येथे परमार्थ प्रेमी हभप पांडुरंग महाराज यांच्या माध्यमातून दिनांक १ मे ते १८ मे २०२४ या कालावधीत सलग सातव्या वर्षी तर श्री ज्ञानोबा तुकोबा सत्संग सेवा संस्था, आळंदी सारशी (वाडा) यांच्या वतीने हभप राजेश महाराज बांगर यांच्या माध्यमातून गांधरे, वाडा येथील कुणबी समाज सभागृह येथे तिसऱ्या वर्षी दिनांक ४ मे ते २० मे २०२४ या कालावधीत निवासी बाल सुसंस्कार शिबीरे सुरू आहेत. ह्या दोन्ही शिबिरांमध्ये जवळपास १०० मुले सहभागी झाली आहेत. शिबीरादरम्यान आचरण व अध्यात्मिक संस्कारांबरोबरोबच योगासने, सूर्यनमस्कार, टाळ, पकवाज, पेटी, अभंग, हरिपाठ, हनुमान चालीसा, गीता, विष्णुसहस्त्रनाम इत्यादी गोष्टी मुलांना शिकविल्या जात आहेत. शनिवार दिनांक ११ मे २०२४ रोजी मुंबईतील जॉय ऑफ गिविंग या संस्थेच्या सभासदांनी संस्कार शिबिरात उपस्थित राहून तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जॉय संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे, असुंता डिसोजा, वैभव मोहन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अशा बाल संस्कार शिबिरांचे महत्वदेखील उपस्थितांसमोर विषद केले. यावेळी संस्थेचे सभासद असलेले सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी हॅप्पी रायडर गजानन पाटील तसेच येत्या ३१ मे रोजी पश्चिम रेल्वेतून ३२ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत असलेले मोटरमन श्री चंद्रशेखर सावंत यांचादेखील सत्कार करण्यात आला. शिबिरांचे आयोजक हभप भोईर महाराज तसेच बांगर महाराज यांचाही सन्मान यावेळी जॉय संस्थेच्या वतीने करण्यात आला. या दोन्ही शिबिरात जवळपास शंभर विद्यार्थी संस्कारित शिक्षण घेण्याच्या इर्षेने सहभागी झाले असून येथे विद्यार्थ्याना, हरिपाठ, संस्कृत संभाषण, हनुमान चालीसा, मैदानी खेळ, योगा याबरोबरच इतर अनेक चांगल्या गोष्टींचे प्रशिक्षण दिले जात आहे. बहुतेक मुले यात पारंगत झाल्याचे दिसून आले. अनेक मुलांनी हनुमान चालीसा, गीतेचा पंधरावा अध्याय तसेच श्लोक अस्खलितपणे बोलून दाखवले. मे महिन्याच्या सुट्टीत मौजमजा न करता पालकांनी त्यांच्या मुलांसाठी संस्कार शिबिरांचा मार्ग निवडला यासाठी मुले व पालकांचे कौतुक करण्यासाठी दरवर्षी या शिबिरांना उपस्थिती लावत असल्याचे वैभव पाटील यांनी सांगितले. अशी संस्कार शिबिरे सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात मुंबई मध्ये सुद्धा आयोजित व्हायला हवीत असे असे मनोगत हिरवे सरांनी व्यक्त केले आणि आपण शिकलेल्या चांगल्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे सांगितले. प्रत्येक मुलाने शिबिरात शिकवल्या जाणाऱ्या चांगल्या गोष्टींचे आपल्या आयुष्यात सदासर्वदा आचरण करावे असे आवाहन लायन्स क्लबच्या अनसुता डिसोझा यांनी केले. यावेळी शिबिरातील मुलांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्वांनीच आळंदीवासी हभप पांडुरंग महाराज भोईर आणि हभप राजेश महाराज बांगर यांचे हा स्तुत्य उपक्रम राबवत असल्याबाबत कौतुक केले. यावेळी जॉय संस्थेचे गणेश धनावडे यांचे तर्फे रायटिंग पॅड तर सूर्यकांत सालम यांनी पेन भेट दिले. चंद्रशेखर सावंत, गजानन पाटील, रमेश माळवदे, प्रियांस हिरवे, प्रथमेश माळवदे आदी जॉय चे कार्यकर्ते तसेच उद्योजक व सामाजसेवक कृष्णा कमलेश बाफना आदी मान्यवरदेखील उपस्थित होते. वास्तविक मोबाईलच्या दुनियेत हरवत व भरकटत चाललेल्या आजच्या पिढीला संस्कारांच्या कक्षेत आणण्यासाठी ही शिबिरे अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. बालवयात मुलांवरील संस्कार चुकले तर त्यांचे पूर्ण आयुष्य बिघडते. त्यामुळे अशा बाल संस्कार शिबिरांची आजच्या पिढीला आणि संस्कारित पाल्य घडवू इच्छिणाऱ्या पालक वर्गालादेखील नितांत गरज आहे. आज समाजात संस्कार शिबिरांचे असलेले महत्व पाहता अशा शिबिरांचे निदान मुलांच्या सुट्टीच्या काळात तरी सर्वत्र आयोजन होणे आवश्यक आहे जेणेकरून काही काळ तरी मुले मोबाईल, टीव्ही ह्यासारख्या घातक व्यसनांपासून दूर राहतील. वेळात वेळ काढून निस्वार्थी भावनेने ही संस्कार शिबिरे भरवणारी मंडळी, समाजात लुप्त होत चाललेले अध्यात्मिक आणि आचरण संस्कार मुलांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्रामीण भागात उन्हाळी सुटटयांमध्ये सुरु झालेला बाल सुसंस्कार शिबीरांचा हा सिलसिला पाश्चात्य संस्कृतीचा अंगीकार करत असलेल्या आजच्या पिढीला अध्यात्मिक व कौटुंबिक संस्कारांची नवी वाट दाखवणारा ठरत आहे. हभप पांडुरंग म भोईर तसेच हभप राजेश म बांगर ह्या शिबिरांच्या आयोजक मंडळींनी शिबिरास भेट देऊन मुलांचा उत्साह वाढवत त्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल जॉयची संपुर्ण टीम तसेच शिबिरासाठी यथाशक्ती योगदान देणाऱ्या श्री कमलेश बाफना यांच्यासारख्या समाजसेवकांबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment