मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची
मुंबईतील वाढत्या गर्दीला पर्याय म्हणून सिडकोमार्फत नवी मुंबई ह्या सुनियोजित शहराची उभारणी करण्यात आली. सिडको व महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियोजनातून या शहराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. अगदी राष्ट्रीय पातळीवरील अनेक मानाचे पुरस्कार या शहराने दिमाखात पटकावले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून सुयोग्य नियोजनाअभावी शहरातील अनेक भाग बजबजपुरी झाल्याचे चित्र आहे. रेल्वे स्थानकांना सिडको किंवा रेल्वे प्रशासनाच्या नियंत्रणाअभावी अनधिकृत फेरीवाल्यांचे वलय पाहायला मिळते. रस्त्यावरील भरमसाठ व अनियंत्रित वाहनसंख्येमुळे सर्वत्र वाहतूक कोंडी व अनधिकृत पार्किंगही फोफावली आहे. गावठाण भागांची अवस्था तर अधिकच बिकट आहे. गेली चार पाच वर्षे पालिकेवर प्रशासक असल्यामुळे या सर्वांवर आवाज उठवणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधिंची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून अनधिकृत व्यवसायांवर कठोर कारवाई, मुबलक पार्किंगची व्यवस्था, रस्ते नियोजन तसेच नवी मुंबईकरांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment