चिनी उत्पादनांवरील निर्बंधांचे धारिष्ट्य भारत दाखवेल?
बाजारात विकल्या जाणा-या चिनी बनावटीच्या वस्तु इतक्या स्वस्त कश्या मिळतात असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. देशातील बहुतांश उत्पादनांमध्ये चिनी वस्तुंचा अंतर्भाव दिसुन येतो. भारतीय बाजारपेठेत चिनच्या उत्पादनांची झालेली घुसखोरी लपून राहीलेली नाही. गेल्या अनेक दशकांपासुन चिनी उत्पादनांवर भारतीयांची असणारी अवलंबिता आज खरेतर गरज बनून गेलेली आहे. त्यामुळे चिनी उत्पादनांवर निर्बंध आणणे म्हणावी तितकी सोपी गोष्ट राहीलेली नाही. स्वदेशीचा पुरस्कार, मेक इन इंडिया, मैन्यूफॅक्चरींग हब वगैरे कितीही वल्गना आपण करत असलो तरी त्यासाठी पोषक वातावरण सध्यातरी देशात नाही. याला कारणीभूत उदयोग व्यवसायांसाठी लागणारे तांत्रिक मनूष्यबळ उभारण्यात आपल्याला आलेले अपयश आहे. आपल्या देशातील तरुणाई आज परदेशी कंपन्यांकडे अधिक प्रमाणात आकर्षित होत असुन विदेशांमध्ये खुल्या होत असलेल्या शैक्षणिक वाटांचा पूरेपूर फायदा उचलताना दिसत आहे. त्यामुळे चिनच्या उत्पादनांना पर्याय उभा करण्यासाठी आज देशात पूरक वातावरण नाही. परदेशातील उत्पादनांच्या आपल्या देशातील विक्रिवरील कर आकारणीत फारशी तफावत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी मात्र चिनमधुन अमेरीकेत विक्रीसाठी येणारी विजेवर चालणारी वाहने, त्यांचे सुटे भाग, बॅट-या यांवर मजबूत कर लादले आहेत. यामुळे अमेरीकेत विजेवर चालणा-या मोटारींवर २५ टक्क्यांवरुन थेट १०० टक्के इतकी घसघशीत कर वाढ होणार आहे. त्यामुळे अमेरीकेतील निर्यातीवर येणा-या निर्बंधातुन येणारी तूट भरुन काढण्यासाठी आगामी काळात भारतासारख्या देशांचा वापर व्यवसाय वाढविण्यासाठी चिन निश्चीतपणे करेल यात शंका नाही. चिनच्या उत्पादनांवर अवाच्या सव्वा कर आकारुन निर्बंध लादण्यासारखे अमेरिकेने दाखवलेले धारिष्टय भारत आजवर दाखवू शकलेला नाही अथवा येत्या काळात तसे करेल अशीही परिस्थिती नाही. भारतीय बाजारपेठा देशी उत्पादनांनी स्वयंपूर्ण होण्यासारखे वातावरण देशात नाही. त्यामुळे चिनवरील अवलंबिता आणखी किती काळ राहील याची निश्चीत कालमर्यादाही नाही. एकीकडे चिनची सिमेवरुन सुरु असलेली घुसखोरी व दुसरीकडे बाजारपेठा ‘’चिन’’मय करण्यासाठी सुरु असणारे प्रयत्न, स्वावलंबी व विकसित देशाचे स्वप्न बाळगणा-या भारतासाठी नक्कीच चिंतेचा विषय आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment