*मोटरमन चंद्रशेखर सावंत यांचे सेवानिवृत्तीला पुस्तके भेट देण्याचं स्तुत्य आवाहन*
दिवस ३ जुलै २०१८, स्थळ अंधेरी रेल्वे स्थानक. मुसळधार पावसामुळे सर्वत्र दैना उडालेली असताना सकाळी साडेसातच्या सुमारास या स्थानकात फलाट क्रमांक ७ व ८ च्या बाजूला काहीतरी भलेमोठे कोसळल्याचा जोरदार आवाज आला आणि त्यासोबतच लोकल रेल्वेचे अर्जेंट ब्रेक अचानकपणे दाबल्याचादेखील. अंधेरी पूर्व पश्चिम भागांना जोडणारा गोखले पादचारी पूल थेट रेल्वे रुळांवर कोसळला होता. फलाटाच्या दिशेने येणाऱ्या लोकलचा आपत्कालीन ब्रेक दाबत लोकलच्या मोटरमनने शेकडो प्रवाशांचे जीव वाचवले होते. काही सेकंद अगोदर लोकल पुढे सरकली असती तर कोसळलेल्या ब्रिजमुळे मोठी जीवितहानी अटळ होती. या लोकलच्या अत्यंत धाडसी व अचूक टायमिंग साधणाऱ्या मोटरमनचे नाव होते *श्री चंद्रशेखर सावंत*. पश्चिम रेल्वेत मोटरमन म्हणून दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या सावंत यांनी दाखवलेल्या ह्या प्रसंगावधनाने अनेकांचे जीव त्या दिवशी वाचले. येत्या ३१ मे २०२४ रोजी श्री चंद्रशेखर सावंत पश्चिम रेल्वेतील सेवेची ३२ वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी त्यांना अनेक शासकीय व स्वयंसेवी संस्थांनी गौरवले आहे. पश्चिम रेल्वेने त्यांचा आदर्श मोटरमन म्हणून गौरव करत रु ५ लक्षच पारितोषिक दिले त्यातील ३ लाख रुपये त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांसाठी खर्च केले. येत्या ३१ मे रोजी त्यांची सेवानिवृत्ती मोठया दिमाखात पार पडणार असली तरी त्यांनी सामाजिक भान जपत आपल्या सेवानिवृत्तीला सर्वांना पुस्तक भेट देण्याचे आवाहन केले आहे. यासाठी आपणास त्यांच्या 8928836332 या क्रमांकावर थेट संपर्क साधता येईल. या दिवशी जमा होणारी पुस्तके ते एखाद्या शाळेत किंवा ग्रंथालयात भेट देणार आहेत. आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशी वाचनसंस्कृतीला हातभार लावण्याचा त्यांनी केलेला संकल्प खरोखरच काबिलेतारीफ आहे. जॉय ऑफ गिव्हींग सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सावंत यांच्याशी सात आठ वर्षांपूर्वी झालेला संपर्क उत्तरोत्तर वाढत गेला. जॉयच्या प्रत्येक उपक्रमात ते हिरीरीने सर्वोतोपरी योगदान देत सहभागी होत असतात. नोकरीला सवडीप्रमाणे यथाशक्ती सामाजिक सेवेची जोड दिली की आयुष्य अधिक सुंदर व समाधानी बनते या उक्तीशी सावंत यांचा स्वभाव अगदी तंतोतंत जुळतो. त्यांनी निवृत्तीनंतरचे आयुष्यदेखील समाजातील गरीब, दुर्बल घटकांच्या सेवेत व्यतीत करावे असे मनोमन वाटते. त्यांना सेवा सेवानिवृत्तीच्या आणि पुढील सामाजिक आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
वैभव
Comments
Post a Comment