या अपघातांना जबाबदार कोण?

दोन दिवसांपूर्वी डोंबिवली ते कोपरदरम्यान २६ वर्षीय रिया राजगोर या तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. या घटनेने खरेतर सगळेच हादरून गेले. मात्र लोकलमधून पडून असे अपघात सातत्याने होत आहेत. रेल्वेतील अनियंत्रित गर्दी प्रवाशांच्या जीवावर बेतताना दिसत आहे. डोंबिवली ते कोपरदरम्यान लोकलमधून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढू लागल्याने मध्य रेल्वेवरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रियाने ठाणे येथील आपल्या कार्यालयात जाण्यासाठी सकाळी ८ वाजताच्या सुमारास डोंबिवली स्थानकातून प्रवाशांनी खचाखच भरलेली ट्रेन पकडली. ट्रेनने वेग पकडल्यावर रियाचा तोल गेला, त्यानंतर ती ट्रेनमधून पडली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. कल्याण, बदलापूर कडून येणाऱ्या लोकल्समध्ये आधीपासून भरपूर गर्दी असते. त्यामुळे दररोज या लोकल ट्रेनने प्रवास करणे प्रचंड त्रासदायक व धोकादायक बनले आहे. त्या दिवशी गर्दीमुळे रियाला आतमध्ये यायला मिळालं नाही. त्यामुळे ती ट्रेनच्या दरवाज्यामध्ये उभी राहिली. लोकलने वेग पकडल्यानंतर डब्बा दोन्ही बाजूने कलंडतो. अशा वेळी लोकलमध्ये गर्दी असेल, तर त्यावेळी भार हा दारात उभे असणाऱ्या प्रवाशांवर येतो. डोंबिवलीनंतर प्रवाशांचा भार आल्याने रियाचा तोल गेला आणि ती ट्रेनमधून पडली अशी माहिती समोर आली आहे. या घटनेच्या चार दिवस आधी २५ एप्रिलला अवधेश राजेश दुबे या तरुणाचा दिवा ते ठाणेदरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला. मागील दोन महिन्यात डोंबिवली ते ठाणे दरम्यान १० जणांचा मृत्यू झाला आहे. डोबिवली ते मुंबईदरम्यान दररोज ३७ लाख रेल्वेप्रवासी प्रवास करतात. मात्र, या प्रवाशांसाठी डोंबिवलीतून फक्त १७ ट्रेन सोडल्या जातात. डोंबिवलीतून अधिकच्या ट्रेन सोडल्या तर अपघाती मृत्यू नक्कीच टाळता येतील. सध्या कल्याण दिशेने पूर्ण क्षमतेने ट्रेन चालविण्यात येत असल्याने ट्रेनची संख्या वाढवणे अवघड आहे. मुंबईतील लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी यापूर्वीच मध्य रेल्वेने अनेक खासगी संस्था आणि सरकारी विभागाच्या कार्यालयांना कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करण्याचा सल्ला दिल्याचे समजते. डाक विभागाने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल केला होता. मात्र इतर आस्थापनांनी याबाबत निर्णय न घेतल्याने मुंबई उपनगरीय रेल्वेतील गर्दी कमी न होता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रचंड गर्दी, रेटारेटी, चेंगराचेंगरी अशी अवस्था मध्य रेल्वेच्या सर्वच महत्वाच्या स्थानकांवर सकाळच्या वेळी पाहायला मिळते. त्यात रियासारख्या अनेक निष्पापांचे नाहक जीव जातात. कार्यालयांच्या वेळा बदलण्याबरोबरच मुंबईतील काही प्रमुख कार्यालये उपनगरांत स्थलांतरित करण्यासाठी विचार व्हायला हवा. प्रवाशांनी देखील आपल्या जिवापेक्षा मोठे काही नाही हे समजून लोकल प्रवास करताना घाई न करता योग्य दक्षता घ्यायला हवी. मुंबई लोकलची दुर्दशा व जीवघेणी गर्दी कमी करण्यासाठी राज्य व केंद्रीय यंत्रणा तसेच नेते मंडळीनी आवश्यक तरतुदी प्राधान्याने करायला हव्यात. लोकल गर्दी व त्यात जाणारे बळी ही मुंबईची आज सर्वात मोठी समस्या आहे. डोंबिवली येथील रियाचा मृत्यू हे आजच्या लोकल प्रवासाच्या दाहकतेचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. रेल्वेतील प्रचंड गर्दीमुळे दररोज कुठे ना कुठे असे अपघात होतच असतात. या अपघातांमध्ये जाणाऱ्या बळींची जबाबदारी नक्की कुणाची ? 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त