प्रवासातील फटफजिती

काही वर्षांपूर्वी मी कामानिमित्त दररोज घणसोली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व्हाया ठाणे असा प्रवास करायचो. संध्याकाळी घणसोलीला परतताना ठाणे स्थानकातुन लोकलची संख्या जास्त असल्यामुळे व ठाण्यावरून जाताना जलद लोकल मिळत असल्याने ठाण्याहुन मुंबईकडचा प्रवास सोयीचा वाटायचा. सायंकाळी घरी येताना बऱ्याचदा कार्यालयीन कामाच्या व्यापामुळे थोडा उशिरच व्‍हायचा. त्या दिवशी देखील असाच उशीर झाला होता. सीएसटी ठाणे ही रात्रीची 8.18 ची धीमी लोकल पकडली. ठाण्यात सव्वानउच्या सुमाराला पोहोचलो. दोन नंबरवरून नऊ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आल्यावर 9.20 ची वाशी लोकल लागली होती. ऑफिसला जाताना माझ्यासोबत नेहमी बॅग असते ज्यात काही महत्वाची कागदपत्रे, ऑफिसचे ओळखपत्र व जेवणाचा डब्बा इत्यादी सामग्री ठेवलेली असते. लोकल रिकामी असल्यामुळे नेहमीप्रमाणे पुढच्या बाजूच्या वाशीकडील डब्यात येऊन विंडो सीटला बसलो. लोकल मध्ये बसल्यावर नेहमी मोबाईलमध्ये एखाद्या विषयावर काहीतरी टाईप करण्याचा उपद्व्याप मी करत असतो. मात्र त्या दिवशी थोडासा थकवा जाणवत असल्याने सोबतची बॅग, वर सामान ठेवण्याच्या रॅकवर ठेवून निवांत बसलो. ठाणे ऐरोली दरम्यानच्या प्रवासातच हवेमुळे मला डुलकीदेखील लागली. घणसोली स्थानकात गाडीने 9.35 वाजता प्रवेश करताच अचानक जाग आली तोवर गाडी स्थानकात थांबली होती. घाईगडबडीमध्ये मी तात्काळ उठून गाडीच्या बाहेर पडलो व घराच्या दिशेने चालू लागलो. काही सेकंदाच्या थांब्यानंतर लोकलदेखील निघून गेली. थोडा वेळ चालल्यावर लक्षात आले की सोबतची बॅग गाडीतच राहिली... मनात काही काळ धस्स झाले. बॅगेत काय होते, किती महत्वाच्या वस्तू होत्या यावर विचारमंथन सुरू झाले. बॅग कशी मिळवता येईल यासाठी विचारचक्र डोक्यात वेगाने फिरू लागले. लगेच खिशातला मोबाईल बाहेर काढला, एम इंडिकेटर सुरू केले. सुटलेली लोकल वाशी स्थानकात 9.49 ला पोहोचणार होती व लगेच 10 वाजता ठाण्यासाठी निघणार होती. बाईक काढून वाशीच्या दिशेने प्रवास सुरु केला असता तरी 10 पर्यंत वाशी स्थानकात पोहोचणे जरा अवघडच होते आणि बॅग मिळण्याची शास्वती फारच कमी. कारण अंतिम स्थानकात सर्व प्रवाशी उतरल्यावर शेवटी राहिलेली बॅग एकतर बेवारस म्हणून गणून पोलिसांच्या स्वाधीन केली जाते किंवा लंपास तरी केली जाते. त्यामुळे रेल्वे पोलीस किंवा स्टेशन मास्तर कडे विचारणा करू असा विचारही मनात आला. मात्र लगेच लोकलच्या परतीच्या प्रवासाची वेळ तपासली. वाशी स्थानकातून 10 वाजता निघून ती लोकल 10.15 ला घणसोली स्थानकात परतणार होती. त्यामुळे एक अखेरचा मार्ग म्हणून त्याच लोकलची व डब्याची वाट घणसोली स्थानकात पाहण्याचा निर्णय घेतला. ज्या डब्यात येताना बसलो होतो त्याच डब्याशेजारी उभा राहिलो. गाडी अगदी वेळेत सव्वादहाला स्थानकात आली. लगोलग मी डब्यात चढलो व मी बसलेल्या सीटवरील रॅकवर पाहतो तर बॅग अगदी सुखरूप जिथल्या तिथे दिसून आली आणि सुटकेचा निश्वास सोडला. इतका वेळ जाणवत असलेला मनावरील तणाव तात्काळ दूर झाला. लगेच बॅग उचलली व लढाई जिंकल्‍याच्‍या अविर्भावात पुढील दरवाज्याने बाहेर पडलो. बसलेले इतर लोक अगदी आश्चर्यचकित चेहऱ्याने माझ्याकडे पाहत होते. गाडी सुटता सुटता खिडकीतून त्यांना 'विसरलो होतो' ची आरोळी देऊन मार्गस्थ झालो. खिशातील मोबाईलमुळे व प्रसंगावधनाने लोकलमध्ये विसरलेली बॅग मला अवघ्या अर्ध्या तासातच परत मिळाली होती ज्याचा आनंद व काही काळ जाणवलेला 'तो' थरारक घटनाक्रम चिरकाल माझ्या लक्षात राहील एव्हढे नक्की.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त