दोस्त मुंबई संस्थेच्या अवयवदान व आरोग्य सेवा दिंडीचा प्रस्थान सोहळा व सत्कार सोहळा संपन्न
रविवारी डॉ डी वाय पाटील रुग्णालयाचे डॉ कैलास जवादे सर यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या दोस्त मुंबई संस्थेच्या एका उत्तम, वैचारिक, सेवाभावी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. दोस्त मुंबई या संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून आषाढी वारी पालखी सोहळ्यादरम्यान अवयवदान व आरोग्य सेवा दिंडीचे आयोजन केले जाते. या उपक्रमादरम्यान वारीमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती आणि आरोग्यविषयक कार्यक्रम राबविण्यात येतात. यामध्ये कॅन्सर जनजागृती, लिव्हर किडनी व पचन संस्था आरोग्य कार्यक्रम, वैद्यकीय शिबीर, चरण सेवा, शस्त्रक्रिया सल्ला, फायब्रोस्कॅन तपासणी इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात. यंदाही या आरोग्य दिंडीचे आयोजन करण्यात आले असून त्याचा प्रस्थान सोहळा व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या समाजातील मान्यवरांचा सन्मान सोहळा रविवार ३० जून २०२४ रोजी वेस्टर्न हिल्स हायस्कुल, कामोठे येथे आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी विचार मंचावर महिला आर्थिक विकास मंडळाच्या महाव्यवस्थापक श्रीमती कुसुम बाळसराफ, मुंबईच्या कौशल्य विद्यालयाच्या प्राचार्य व सत्यसाई संजीवनी रुग्णालयाच्या बालरोग तज्ञ डॉ शुभरा प्री कम्प्ले, जेष्ठ वैद्यकीय पत्रकार श्री संतोष आंधळे, इंडीयन मेडिकल कौंसिलचे डॉ मेटकर आदी मान्यवर उपस्थित होते. ह्या कार्यक्रमादरम्यान शल्य चिकित्सा विभागातील उत्तम कामगिरीसाठी झेडटीसीसी अध्यक्ष डॉ सुरेंद्र माथूर, प्रशासन विभागात माजी आरोग्य सहाय्यक संचालक व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे वरिष्ठ सल्लागार डॉ अरुण यादव आणि समाजसेवा विभागात फेडरेशन ऑफ ऑर्गन डोनेशन चे अध्यक्ष डॉ परुषोत्तम पवार यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी अवयवदानाचे महत्व विषद करत "दोस्त" संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. डॉ कम्प्ले यांनी आरोग्याच्या बाबतीत औषध गोळ्यांवर फारसे विसंबून न राहता उपचारांपेक्षा प्रतिबंध कसा चांगला याबाबत मार्गदर्शन केले. यासाठी दिनचर्या कशी असावी हेदेखील समजावून सांगितले. पत्रकार संतोष आंधळे यांनी अवयवदानाबाबत आलेले अनुभव कथन करत अवयवदानाची ही चळवळ अधिक व्यापक होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अवयवदात्यांचा योग्य सन्मान होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कुसुम बाळ सराफ यांनी महिलांच्या उन्नतीसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत समाजातील महिलांचे स्थान अधोरेखित केले. यावेळी सत्कार मूर्तींची देखील मनोगते सादर झाली. यावेळी वारीदरम्यान दाखवण्यात येणाऱ्या अवयवदायाबाबत जनजागृतीपर ऑडिओ संदेशाचेदेखील उद्धाटन करण्यात आले. अवयवदानाची सुरू असलेली ही चळवळ अधिक प्रखर होण्यासाठी आणि अधिकाधिक अवयव दाते नोंदणीकृत होण्यासाठी शासनाबरोबरच समाजातील जागरूक घटक आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे मत दोस्त मुंबई संस्थेचे डॉ कैलास जवादे यांनी व्यक्त केले. अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी डॉ जवादे कुटुंबीय व त्यांची संपूर्ण टीम करत असलेले कार्य अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय असून आषाढी वारीसारख्या महाराष्ट्रातील भव्य दिव्य सोहळ्यातील त्याची परिणामकारकता उत्तरोत्तर वाढत जावो व अधिकाधिक अवयवदाते ह्या सर्वोच्च दानासाठी पुढे येवोत ह्याच शुभेच्छा.
वैभव
Comments
Post a Comment