शाळांच्या आवारात तंबाखू विक्री

शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास प्रतिबंध आहे. असे असताना शहरी भागातील बहुतांश शाळा परिसरात पान टपऱ्या बिनधास्तपणे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच मद्यविक्रीची दुकानेदेखील जागोजागी दिसून येतात. शालेय, महाविद्यालयीन मुलांचे भवितव्य सुरक्षित राहावे, त्यांनी व्यसनांपासून दूर राहावे यासाठी अनेक कडक नियम शासनाने केलेले आहेत. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने समाजविघातक प्रवृत्तीनकडून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यात तंबाखू, गुटखाविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. अनेक ठिकाणांवरून गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे. यावरून अशा पदार्थांचे सेवन किती मोठया प्रमाणात करण्यात येते हे समोर आले आहे. यात अल्पवयीन मुलांची संख्याही मोठी आहे. तंबाखूसेवनाचे दुष्परिणाम व त्याचे आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांची जाणीव असतानाही समाजातील मोठा गट व शाळा महाविद्यालयीन मुले हे व्यसन करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अशा नशेच्या पदार्थांच्या विक्रीवर कडक निर्बंध व तितक्याच कठोरतेने कारवाई होणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. अन्न व औषध प्रशासन, पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून अशा पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर व त्यांना अभय देणाऱ्यांवर सक्त व नियमित कारवाई गरजेची आहे.


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त