अपात्र लाभार्थ्यांचा भार नको

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना नक्कीच स्वागतार्ह व लक्षावधी गरजू महिलांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. याचा लाभ गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील असंख्य गृहिणींना मिळणार आहे. यासाठी महिलांची होत असलेली धावपळ पाहता मुदतीमध्ये खरंतर वाढ करण्याची गरज आहे. तसेच दरवर्षी यामध्ये दिल्या जाणाऱ्या रक्कमेतही वाढ करण्यात यावी. मात्र दरवेळी सरकारी योजनांमधील अनुभवास येणारी लाचखोरी, दलाली या योजनेतही होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कुठे दाखल्यांसाठी अडवणूक तर कुठे पैशांची मागणी असे प्रकार दररोज उघडकीस येत आहेत. ह्या गैरप्रकरांवर अंकुश ठेवण्यात सरकारी यंत्रणांना अपयश येत आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. मात्र या आडवाटांचा फायदा घेत पात्र नसणारे लाभार्थींदेखील सरसकट ह्या योजनेत समाविष्ट होण्याची शक्यता वाढली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ठराविक निकष सरकारने दिलेले आहेत. यात प्रमुख पुरावे असणारे उत्पन्न, रहिवाशी व जन्म दाखल्यांच्या सत्यतेत व वितरणात पारदर्शकता राखणे गरजेचे आहे. हे दाखले मिळवून देण्यासाठी वावरणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई करण्यात यावी. सरकारी, निमसरकारी कार्यालयांमध्ये योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे युद्धपातळीवर उपलब्ध करून देणारी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. योजना नक्कीच कौतुकास्पद आहे मात्र सरकारी तिजोरीवर अपात्र लाभार्थ्यांचा भार पडू नये म्हणून योग्य काळजी घ्यावी एव्हढेच ! 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त