अतिउत्साही पर्यटकांमुळे पावसाळी पर्यटन धोक्यात
मुंबईतील विविध काॅलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा एक गट सोडाई किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. मात्र, ट्रेकिंगला जाण्याऐवजी ते दुपारी पोखरवाडी येथील मोरबे डॅमच्या बंधाऱ्याजवळ आले. यापैकी एक जण बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरला. त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडत असताना वाचविण्यासाठी अन्य तिघे मित्र गेले. यामध्ये चौघांचाही बुडून मृत्यू झाला. पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावरच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने पावसाळी पर्यटन पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. अति उत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी राज्यातील अनेक पर्यटन स्थळांवर फिरण्यास लोकांना बंदी घालण्यात येते. पावसाळ्यात हिरवळ, पाणथळ, धबधबे, ओढे, नद्या, बंधारे, तलाव इत्यादी ठिकाणी निसर्गसौंदर्याचा निराळा आस्वाद घेता येत असल्याने दरवर्षी पर्यटक मोठया संख्येने अशी ठिकाणे आवर्जून हेरत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून ह्या ठिकाणी घडत असलेल्या दुर्घटनांचा फटका पावसाळी पर्यटनाला बसत आहे. अति उत्साह, अति आत्मविश्वास, सेल्फी वेड, नशेच्या पदार्थांचे सेवन अशी कारणे या दुर्घटनांना असून त्यावर अंकुश आणण्याचे प्रशासन व स्थानिकांचेदेखील प्रयत्न असतात. मात्र तरीदेखील 'हम नही सुधरेंगे' या उक्तीनुसार अशा घटना सातत्याने घडतच असल्याने अनेक पर्यटन स्थळेच पावसाळ्यात बंद करण्याची वेळ प्रशासनावर येते. यामुळे मित्रमंडळी, कुटुंबासह पावसाळ्यात निसर्गाचा मुक्त आंनद घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment