अशा गुन्ह्यांतील आरोपी सुटू नयेत
सत्ता आणि पैशाच्या बळावर काहीही मिळवता येते हा धनदांडग्यांचा भ्रम दुर्दैवाने खरा ठरताना दिसतोय. परवाना नसतानाही महागड्या गाड्या बेदरकारपणे हाकत सर्वसामान्यांच्या जीवावर उठणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील घटनेनंतर मुंबईतील वरळीत घडलेली घटना त्याचाच प्रत्यय देणारी आहे. गाडीखाली चिरडून एखाद्याचा जीव घेणारी व्यक्ती पकडल्यानंतर काही दिवसांतच कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत कशी सुटते याचेच खरंतर अप्रूप वाटते. एरव्ही किरकोळ प्रकरणांमध्ये सर्वसामान्य लोकांना वर्षानुवर्षे न्यायालयाचे खेटे मारावे लागतात. मात्र पैशाच्या जोरावर अशा प्रकारे गंभीर गुन्ह्यांमध्ये सुटका होत असेल तर भविष्यात अशा बड्या बापाच्या धेंडांची हिंमत नक्कीच वाढणार आहे. काहीही केले तरी पैसा खर्च करून किंवा वशील्याने आपली सुटका होणारच आहे हा भ्रम उच्चभ्रू वर्गामध्ये दृढ होत चाललेला आहे. त्यामुळेच रात्री अपरात्री मद्यपान करून वाहने चालवणाऱ्या श्रीमंत घरातील तरुणांची संख्या मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये वाढलेली आहे. त्यांना वेळीच आवरले नाही तर राज्यातील कायदा व न्यायव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याशिवाय राहणार नाही. अशा गुन्ह्यातील आरोपींना जमीन मिळू नये म्हणून कठोर नियम आणावे लागतील. त्यांना कायद्याने त्यांना कडक शिक्षा दिली तरच भविष्यात असे गुन्हे होण्याआधी भरकटलेली तरुणाई अनेकदा विचार करेल.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment