अशा गुन्ह्यातील आरोपी सुटू नयेत

नवी मुंबईसारख्या अत्याधुनिक व सुरक्षित शहरात मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी कौटुंबिक त्रासातून सुटका करून घेण्यासाठी आलेल्या विवाहितेवर मंदिरातील पुजाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराची व खुनाची घटना अत्यंत वेदनादायक व चीड आणणारी आहे. यामुळे समाजात अजूनही महिला सुरक्षित आहेत का यावर शंका उपस्थित होत आहे. कायदा व परिणामांची भीती राहिलेली नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. नवी मुंबई ही सुशिक्षित, सुसंस्कृत व सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. शहरात घडणाऱ्या प्रत्येक अनुचित घटनेचे पडसाद तात्काळ सर्वत्र उमटतात. सदर घटनेतील पिडितेला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी नवी मुंबईतील नागरिक, सामाजिक संस्था, संघटना व जागरूक घटक आज रस्त्यावर उतरून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी करत आहेत. अन्याय अत्याचाराच्या विरोधात एकजुटीने आवाज उठवून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत माघार घेतली जाणार नाही हाच संदेश या निमित्ताने नवी मुंबईकर देत आहेत. कितीही गंभीर गुन्हा असला तरी काही काळाने त्याचा तपास व मागोवा थंडावतो व गुन्हेगार तुरुंगातून सुटण्याचा मार्ग मोकळा होतो हा आजवरचा अनुभव आहे. मात्र नवी मुंबईतील ह्या अत्यंत निंदनीय घटनेतील कुठलाही आरोपी कोणत्याही परिस्थितीत कायद्याच्या पळवाटा शोधत सुटू नये याची तजवीज पोलिसांनी करायला हवी.



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त