पाण्याशी खेळ नकोच !

रविवारचा दिवस. हडपसरच्या सय्यदनगरच्या अन्सारी कुटुंबाचा वर्षा सहलीसाठी भूशी डॅमवर जाण्याचा प्लॅन झाला. कुटुंबातील सगळेच 16-17 सदस्य भूशी डॅमच्या वरच्या भागात धबधबा पाहण्यासाठी गेले. संथ गतीने वाहणाऱ्या पाण्यात कुटुंबातील सदस्य उतरले, पण अचानक पाण्याचा जोर वाढला अन् होत्याचं नव्हतं झालं. एका डोंगरातून धबधबा वाहत होता. धबधब्याला पाणी कमी होतं. अन्सारी कुटुंबाने त्या धबधब्याच्या खाली भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला. पुढे काय होईल याचा कोणाला अंदाज नव्हता. अचानक पाण्याचा जोर वाढला आणि अन्सारी कुटुंब अडकलं. पाण्याचा वेढा पडल्याने सगळे एकमेकांना धरून खडकावर उभे होते. पाण्याच्या बाहेर असलेल्या लोकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र पाण्याचा वाढता जोर त्यांना बाहेर पडू देत नव्हता. अखेर हे संपूर्ण कुटुंब लहान मुलांसह पाण्यात वाहून गेल्याची अत्यंत हादरून सोडणारी वेदनादायी व्हिडिओ क्लिप सर्वांनी पाहिली. ह्या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. मागील आठवड्यात असाच  मुंबईतील विविध काॅलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा एक गट सोडाई किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. मात्र, ट्रेकिंगला जाण्याऐवजी ते दुपारी पोखरवाडी येथील मोरबे डॅमच्या बंधाऱ्याजवळ आले. यापैकी एक जण बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरला. त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडत असताना वाचविण्यासाठी अन्य तिघे मित्र गेले. यामध्ये चौघांचाही बुडून मृत्यू झाला. पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावरच घडलेल्या या दुर्दैवी घटनांनी पावसाळी पर्यटन पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. अति उत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी राज्यातील अनेक पर्यटन स्थळांवर फिरण्यास लोकांना बंदी घालण्यात येते. पावसाळ्यात हिरवळ, पाणथळ, धबधबे, ओढे, नद्या, बंधारे, तलाव इत्यादी ठिकाणी निसर्गसौंदर्याचा निराळा आस्वाद घेता येत असल्याने दरवर्षी पर्यटक मोठया संख्येने अशी ठिकाणे आवर्जून हेरत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून ह्या ठिकाणी घडत असलेल्या दुर्घटनांचा फटका पावसाळी पर्यटनाला बसत आहे. अति उत्साह, अति आत्मविश्वास, सेल्फी वेड, नशेच्या पदार्थांचे सेवन अशी कारणे या दुर्घटनांना असून त्यावर अंकुश आणण्याचे प्रशासन व स्थानिकांचेदेखील प्रयत्न असतात. मात्र तरीदेखील अशा घटना सातत्याने घडतच असल्याने अनेक पर्यटन स्थळेच पावसाळ्यात बंद करण्याची वेळ प्रशासनावर येते. यामुळे पर्यटनासाठी जाताना लोकांनी कुटुंब सहकाऱ्यांसह स्वतःची सुरक्षा व जास्त सतर्कता बाळगण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद जरूर घ्या मात्र पाण्याशी खेळ नकोच!


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त