होय.... परिवर्तन होतेय
न समजलेला देवमाणूस "बाप"

"बाप समजून घेताना" या वैचारिक व प्रबोधनात्मक व्याख्यानांची मालिका महाराष्ट्रभर चालवणारे प्रख्यात वक्ते प्रा श्री वसंत हंकारे सर यांचे व्याखान प्रत्यक्ष ऐकण्याची इच्छा आज पूर्ण झाली. आज रविवारी कोपरखैरणे येथील लोहाना समाज हॉलमध्ये स्वराज्य संघटनेच्या वतीने त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महिला, पालक-विद्यार्थ्यांच्या प्रचंड संख्येतील उपस्थितीने हॉल अगदी ओसंडून वाहत होता. सरांची अनेक व्याख्याने आजवर सोशल माध्यमांवर ऐकली होती. आज तीच ऊर्जा, तोच आत्मविश्वास व तोच भारदस्त आवाज प्रत्यक्षात अनुभवता आला. शाळा, महाविद्यालयीन मुलांवर लुप्त होत चाललेले कौटुंबिक संस्कार, वाढती व्यसनाधीनता, सामाजिक कुप्रवृत्ती व अल्पवयीन मुलामुलींची भरकटत चाललेली पिढी यावर अचूक भाष्य करत त्यामध्ये परिवर्तन नक्कीच शक्य आहे हे दाखवणारे प्रा हंकारे सरांचे व्याख्यान नेहमीसारखेच सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारे, भावनाविवश, संवेदना जागवणारे व डोळ्यात अश्रू आणणारे होते. छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगताना छत्रपती शिवरायांसारख्या वडिलांप्रति त्यांची अतूट नाळदेखील त्यांनी उलगडवून दाखवली. आई-बापाचा मुलासाठीचा त्याग, काबाडकष्ट व मुलांवरील अतोनात प्रेम समजावून सांगताना त्यांच्या विश्वासाला, त्यागाला, प्रेमाला तडा जाऊ न देण्याचा इशारा ते अत्यंत पोटतिडकीने व तितक्याच भावूकतेने देतात. त्यांनी समजवलेला वाघासारखा बाप व वाघिणीसारखी आई एकून उपस्थित कुणाच्या डोळ्यात पाणी आले नसेल असे कधी होणार नाही. व्याख्यान ऐकताना मुला मुलींबरोबरच उपस्थित पालकांच्या डोळ्यांतील अश्रू बरेच काही सांगून जात होते. त्यामुळे आजकालच्या भरकटत चाललेल्या पिढीला वठणीवर आणण्यासाठी सामाजिक परिवर्तनाचा अनोखा ध्यास घेतलेल्या प्रा वसंत हंकारे सरांची व्याख्याने जागोजागी आयोजित केली तर 'होय'.... अजाणतेपणी चुकीचे निर्णय घेऊन वाईट वळणावर चाललेल्या मुलांमध्ये परिवर्तनाची लाट नक्कीच शक्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच हा 'बाप' नावाचा न समजलेला देवमाणूस प्रा हंकारे सरांच्या वाणीतून एकदा तरी नक्कीच अनुभवा व या लाटेत सामील व्हा.
वैभव
Comments
Post a Comment