७८व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
स्वातंत्र्य दिनी घ्या तंबाखू आणि प्लॅस्टिक मुक्तीची शपथ
भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७८वा वर्धापन दिन १५ ऑगस्ट २०२४ रोजी साजरा होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके लोटली तरी आपण अनेक अनिष्ट, अनुचित रूढी, परंपरा, सवयीच्या जोखडात बंदिस्त आहोत. व्यसन हे कुठलेही वाईटच. मात्र अनेक व्यसने ही प्राणघातक ठरु शकतात. त्यातीलच एक घातक व्यसन म्हणजे तंबाखू सेवन. आज आपल्याभोवती वावरणाऱ्या बहुतांशी लोकांना तंबाखूचे व्यसन असल्याचे दिसून येते. गुटखा, खर्रा, जर्दा, विडी, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यात आपला समाज आज सापडलेला आहे. आज आपण कार्यालये, सार्वजनिक स्थळे, बस, रेल्वे परिसर, सिनेमागृहे, सार्वजनिक प्रसाधनगृहे ही सर्वच ठिकाणे बारकाईने पाहीली तर त्या ठिकाणी हे व्यसनी लोक हे परिसर अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त करताना दिसतात. सरकारने तंबाखूबंदीचे कडक कायदे आणूनदेखील लोक त्याला जुमानेसे झाले आहेत. तंबाखूविरोधी कायदा आज राज्यात अस्तित्वात आहे. तंबाखूच्या य पदार्थांची विक्री खुलेआम आज टपऱ्यांवर, बाजारात, रेल्वे मध्ये, कार्यालयांमध्ये होताना दिसते. तंबाखूच्या दुष्परिणामांची माहीती असतानादेखील त्याचे सेवन म्हणजे आत्मघातकीपणाच म्हणावा लागेल. मात्र व्यसनी लोक त्याच्या इतके आहारी गेले आहेत की त्यांचे व्यसन सोडवणे म्हणजे एक दिव्यच आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे देशाच्या प्रजासत्ताक दिनी तंबाखूमुक्तीची शपथ सर्वत्र देणे आवश्यक आहे. तंबाखूमुक्तीचा नारा आजच देऊन राज्य व देश तंबाखूमुक्त करणे काळाची गरज आहे. आज बहुतांशी सर्वच शाळा, महाविदयालये, सरकारी कार्यालये, चौक, पदपथ, राजकीय कार्यालये, गृहनिर्माण संस्थांच्या ठिकाणी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यावेळीच उपस्थित नागरिकांना, शालेय- महाविदयालयीन विदयार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देणे गरजेचे आहे. तंबाखूचे दुष्परिणाम व त्यापासुन होणा-या कर्करोगासारख्या गंभीर आजारांची माहिती त्यांना करुन देण्यात यावी जेणेकरुन तंबाखूजन्य पदार्थांपासुन ते परावृत्त होतील व इतरांना देखील दुर ठेवण्याचा प्रयत्न करतील. तंबाखूमुक्त महाराष्ट्रासाठी ठोस प्रयत्न होणे गरजेचे असुन स्वातंत्र्य दिनापासुन त्याची सुरुवात करायला काय हरकत आहे?
आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज प्रभात फेरी, ध्वजारोहन, वक्तृत्व व इतर क्रीडा स्पर्धांची रेलचेल, शाळा, महाविद्यालयांत पाहायला मिळत आहे तर आपल्या परीसरात अवतीभोवतीदेखील सर्वत्र सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची नांदी असणार आहे. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र प्लॅस्टिकच्या ध्वजांची दयनीय अवस्था बघितली तर आपल्या बेगडी राष्ट्रप्रेमाची किव येते. प्लास्टिक हा अविघटनशील घटक असल्यामुळे निसर्गात त्याचा निचरा होत नाही. यामुळे जमा झालेले प्लास्टिक रसायनाचे रूप धारण करते व ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. निसर्गदेखील त्याला पचवू शकत नसल्याने त्याचा अतिरिक्त भार पर्यावरणावर पडतो व त्याचे देखील संतुलन बिघडते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोठ्या अभिमानाने मिरवणाऱ्या राष्ट्रध्वजाचा इतर वेळी मात्र आपण नको तितका अवमान करतो. खरेतर प्लॅस्टिकजन्य पदार्थांपासुन बनवलेल्या राष्ट्रध्वजावर बंदी असतानादेखील असे ध्वज सर्रास रेल्वे स्टेशन, बाजार, बस थांबे, रस्त्यारस्त्यांवर कसे उपलब्ध होतात हा प्रश्न पडतो, त्यामुळे असे राष्ट्रध्वज खरेदी न करण्याची जबाबदारी भारतीय नागरिकांचीच आहे. कापडी किंवा कागदी राष्ट्रध्वजच वापरावेत, त्यांची योग्य प्रकारे हाताळणी करावी व वापर झाल्यावर उचित मार्गाने विघटन करावे अथवा जपून ठेवावेत. प्लास्टिक राष्ट्रध्वज न वापरता राष्ट्रसन्मानाला तसेच पर्यावरण संतुलनाला हातभार लावणे हि प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तसेच प्लॅस्टिकमुळे होणारे दुष्परिणाम पाहता आपण आपल्या दैनंदिन जिवनातुन हददपार केले पाहिजे. प्लॅस्टीकबंदीचा कायदा सरकारने काढलेला असतानादेखील मोठया प्रमाणावर प्लॅस्टीक बाजारात सर्रास विकले जात आहे. कायदा अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या काळात तिव्र करण्यात आलेली मोहिम सध्या थंड झाल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्या, सामान, खेळणी, वस्तू न वापरता पर्यावरणाला हातभार लावण्याचा संकल्प प्रत्येकाने करायलाहवा. या स्वातंत्र्य दिनी आपण सर्व 'प्लॅस्टिकमुक्त भारत' हि संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करू या. जय हिंद ।।
वैभव मोहन पाटील
घणसोली,नवी मुंबई
Comments
Post a Comment