ऑलिम्पिक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वजन वाढल्यामुळे पैलवान विनेश फोगटला संपूर्ण स्पर्धेतूनच अपात्र ठरविण्यात आले. यानंतर दुसऱ्याच दिवशी तिने निवृत्तीची घोषणा केली. जगातील आघाडीच्या पैलवानांना चितपट केल्यानंतर भारताची कन्या विनेश फोगटला ऑलिंपिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी केवळ काही ग्रॅम वजनाच्या फरकाने अपात्र ठरवले जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. खेळामध्ये सातत्याने सर्वोत्तम कामगिरी करत असलेल्या खेळाडूला केवळ काही ग्रॅम वजन वाढल्याने अपात्र ठरवणे कुठल्याही भारतीयाला रूचलेले नाही. अंतिम फेरीपर्यंत धडक दिलेल्या विनेशना अंतिम सामना खेळण्याची संधी मिळायला हवी होती. मात्र या घटनेतून भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंच्या व्यवस्थापनावरदेखील अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळाडूंना सहाय्य करण्यासाठी मोठा स्टाफ नेमलेला असतो. खेळाडूने केवळ स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करणे आणि सपोर्टिंग स्टाफ, फिजिशियन, डाएटीशीयन, फिजिओ या स्टाफने खेळाडूंच्या बाबतीत इतर आवश्यक गोष्टींची काळजी घेणे अपेक्षित असते. मग या अशा मोठ्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करीत असताना एव्हढी किरकोळ चूक झालीच कशी अशी शंका उपस्थित होत आहे. विनेश फोगटच्या बाबतीत नेमकं काय घडलं याची चौकशी व्हावी व जबाबदारी निश्चित व्हायला हवी. तरच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. संपूर्ण देशाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद ठरणाऱ्या घटनेस एका छोट्या चुकीमुळे देशवासिय मुकले व एका कर्तृत्ववान खेळाडूची कारकीर्ददेखील पणाला लागली. भविष्यात जागतिक कीर्ती गाजवणारे खेळाडू निर्माण करायचे असतील तट अशा चुका प्रकर्षाने टाळायला हव्यात व यासाठी जबाबदार घटकांवर वेळीच कडक कारवाई करायला हवी.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment