सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर वाढवा

प्रदूषणमुक्त वातावरण निर्मितीसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, मात्र त्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध आहे का याची चाचपणी केली जात नाही. सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी आवाहन केले जात आहे. मात्र त्यासाठी पुरेशा संख्येत सीएनजी वा चार्जिंग पंप अस्तित्वातच नाहीत हीदेखील वस्तुस्थिती आहे. अशाने प्रदूषण मुक्त रस्त्यांचा उद्देश सफल कसा होणार असा प्रश्न उपस्थित होतो. सीएनजी भरण्यासाठी उपलब्ध पंपांवर लांब रांगा लागतात. इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन कुठेच दिसत नाहीत. आज सर्वात जटिल समस्या आहे ती म्हणजे जिकडे तिकडे होत असलेल्या वाहतूक कोंडीची. या वाहतूक कोंडीत तासंतास वाहने खोळंबलेली असतात. त्यात इंधनासारख्या राष्ट्रीय संपत्तीचा होणारा ह्रास तर आहेच पण वातावरणात पसरणारा घातक वायूदेखील मानवी आरोग्यास अपायकारक आहे. वाहन विक्री पर्यायाने वाहनांच्या संख्येवर नियंत्रण आणणे ही आज सर्वात मोठी गरज आहे. भरमसाठ संख्येत वाढत चाललेली वाहने रस्ते व्यापुन टाकत आहेत. त्यामुळे होणारे प्रदूषण व अपघात आज अनेकांच्या जीवावर बेतत आहेत. यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला गेला पाहिजे व अधिकाधिक लोकांना या वाहतुकीचा वापर करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त