केळठणच्या सरस्वती गणपत पाटील विद्यालयात जॉय संस्थेचा विद्यार्थी मदत उपक्रम

जॉय ऑफ गिव्हिंग सामाजिक संस्थेचा उपक्रम 
जॉय ऑफ गिव्हिंग ह्या सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थी मदत उपक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी पालघर जिल्ह्यातील केळठण येथील सरस्वती गणपत पाटील माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. या विद्यालयात शिकणाऱ्या एकूण १७० मुलांना संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप याप्रसंगी करण्यात आले. यावेळी संस्थेचे सभासद वैभव पाटील, गजानन पाटील, निलेश घोडविंदे आदी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील, सहशिक्षक कुमार पाटील, सह शिक्षिका राजश्री वेखंडे, वर्षा सावंत, लिपिक योगेश पाटील, शिपाई दिपक ठाकरे, नरेश पाटील तसेच उपस्थित ग्रामस्थ रामचंद्र पाटील यांचादेखील सन्मान जॉय संस्थेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय पाटील यांनी केले तर योगेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. संस्थेच्या कार्याची संक्षिप्त माहिती देत वैभव पाटील यांनी मुलांना अभ्यासामध्ये झोकून देण्याचा सल्ला दिला. शाळेची वाढती पटसंख्या व दहावीचा दरवर्षी लागणारा ९५% पेक्षा अधिक निकालाबद्दल त्यांनी शिक्षक व शाळा प्रशासनाचे कौतुक केले. ८वी ते १०वी ची शैक्षणिक वर्षे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट असल्याचे सांगत यानंतर खऱ्या अर्थाने मुलांच्या करिअरला सुरुवात होत असल्याचे मत त्यांनी मांडले. आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर आपल्या उत्पन्नातील काही अंशी वाटा सामाजिक बांधिलकी म्हणून दुर्लक्षित गरीब गरजू घटकांच्या मदतीसाठी देण्याचा संदेश या निमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. ह्या उपक्रमासाठी जॉय संस्थेचे संस्थापक श्री गणेश हिरवे तसेच शाळा व शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री के जी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर मुलांना शासनाच्या १०८ ह्या महत्वाकांक्षी उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी १०८ रुग्णवाहिकेचे प्रात्यक्षिक व कार्यप्रणाली मुलांना रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी समजावून सांगीतली. जॉय संस्थेमार्फत ठाणे व पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागांत सातत्याने शैक्षणिक सहाय्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून आजवर अनेक शाळा, वृद्धाश्रम, अनाथालये, आश्रमशाळा, कर्णबधिर मुलांच्या शाळेमध्ये शैक्षणिक व जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आल्याचे जॉयचे सभासद वैभव पाटील यांनी स्पष्ट केले. हे उपक्रम राबविण्यासाठी जॉयचे संस्थापक व आदर्श शिक्षक गणेश हिरवे सरांची मेहनत तसेच संस्थेच्या सर्व सभासदांचे योगदान अत्यंत मौलिक असल्याचेदेखील त्यांनी विषद केले. आगामी काळात दुर्गम व दुर्लक्षित घटकांपर्यंत जॉयचा मदतीचा हा ओघ असाच अविरत सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान जॉयचे सभासद व सेवानिवृत्त रेल्वे मोटरमन चंद्रशेखर सावंत यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमावेळी त्यांनी केलेल्या आवाहनानुसार जमा झालेली जवळपास १०० पुस्तके काटी येथील जिल्हा परिषद शाळेच्या ग्रंथालयासाठी भेट देण्यात आली. जॉय संस्था करत असलेले कार्य अद्वितीय असल्याचे मत याप्रसंगी उपस्थित शिक्षकवृंदानी व्यक्त केले व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त