शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष

काल घणसोली सेक्टर ४ मधील शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळास भेट देऊन घणसोलीच्या महाराजा चे दर्शन घेतले. यंदा या मंडळाने राजाचा अत्यंत सुंदर असा राजमहल साकारलेला असून मुख्य मंडपात श्रीगणेशाच्या भव्यदिव्य व आकर्षक मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसोबतच छत्रपती शिवरायांची मूर्ती व महापुरुषांच्या प्रतिमा स्थापलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत हा देखावा अत्यंत सुबक व देखणा झालेला आहे. दिवसभर, अगदी रात्री उशिरापर्यंत रहिवाशी भक्तगण हा देखावा पाहण्यासाठी येत असून आपल्या आप्तस्वकीयांना देखील आवर्जुन दाखवताना दिसत आहेत. यंदा हे मंडळ गणेशोत्त्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. मंडळाची गेल्या २५ वर्षांची गौरवशाली वाटचाल घणसोली नगरीला सामाजिक उपक्रमांनी समृद्ध करणारी ठरली आहे. मंडळाच्या ह्या असामान्य कामगिरीसाठी त्यांचे कौतुक करावे तितके थोडके आहे. घणसोली नवीन वसाहतीच्या निर्मितीपासून आजवरच्या घडामोडींचा मीदेखील एक साक्षीदार आहे. कुठलाही सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडाविषयक उपक्रम हाती घेतल्यानंतर त्यामध्ये सातत्य राहिलेले पहावयास मिळणं खरंतर दुर्मिळ होत चालले आहे. एखाद्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नियमितपणे संस्कृती जोपासणारे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवणे आजकाल कष्टप्रद, खर्चिक व कठीण बाब झालेली आहे. त्यामुळे अनेक मंडळे मोठया उत्साह, जल्लोषात उपक्रम सुरू करतात मात्र विविध कारणांनी त्यात सातत्य राखणे अनेकांना शक्य होत नाही. मात्र शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळाच्या माध्यमातून गेली २५ वर्षे सातत्याने लोकसेवेत राहण्याचा आपला संकल्प पूर्णत्वाला नेणारे घणसोलीतील जेष्ठ समाजसेवक श्री कृष्णा बापू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे ह्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मनापासून अभिनंदन. मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेला गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कला स्पर्धा यांचे स्वरूप दर्जेदार तर असतेच मात्र त्याची भव्यता व सातत्य मंडळाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. प्रत्येक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जितकी धडपड श्री कृष्णा पाटील यांची असते तितकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक त्यांच्या सहकारी सदस्यांची दिसून येते. त्यामुळेच मंडळाचा प्रत्येक उपक्रम शिस्तबद्ध, भव्यदिव्य, शांततापूर्ण, सामाजिक संदेश देणारा व कमालीचा कौटुंबिक असल्याचे वेळोवेळी दिसुन आले आहे. २०१९च्या गणेशोत्सवाच्या वेळेस त्यांनी आगमन व विसर्जन सोहळ्यातील खर्चास फाटा देत सदर रक्कम पुरग्रस्तांसाठी भेट दिल्याचे मी पाहिले आहे. त्यामुळे ह्या मंडळाचे कार्य नक्कीच उजवे ठरते. कार्यक्रमांदरम्यान मंडळास भेट देणाऱ्या प्रत्येकाची मग तो प्रतिष्ठित मान्यवर असो की परिसरातील सर्वसामान्य रहिवाशी नागरिक सर्वांनाच योग्य तो सन्मान देण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो. राजकारणातून समाजसेवा करू इच्छिणाऱ्या श्री कृष्णा पाटील यांचा सामाजिक ऋणानुबंध त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसून येतो. त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक त्यांच्याबद्दल एक प्रकारचा आदरभाव बाळगून आहेत. कुठलीही जात, पात, धर्म, पक्ष, गरीब श्रीमंत न पाहता आपल्या परीने प्रत्येकाला मदत करण्याची भावना व इच्छाशक्ती त्यांची पदोपदी जाणवते. म्हणूनच एका वैचारिक पातळीवर त्यांचेशी चर्चा करताना त्यांच्या दिलखुलास स्वभावाचे दर्शन नेहमीच घडते. २५ वर्षांपूर्वी शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी लावलेले रोपटे आज वटवृक्ष झालेला आहे ज्याच्या सावलीत घणसोलीतील असंख्य नागरिक चार क्षण आनंदाचे, शांतीचे व समाधानाचे म्हणून विसावतात. या मंडळावर प्रेम करणारा नागरिक जेष्ठ आहे, वारकरी आहे, उत्सवप्रेमी आहे, खेळाडू आहे आणि कलाकारही आहे. सर्व स्तरांतील लोकांचे लाभलेले प्रेम उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जावो व मंडळाची गोल्डन जुबिलीदेखील मोठ्या उत्साहात साजरी होवो अशा शुभेच्छा मी शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांना यानिमित्ताने देतो.
 


वैभव मोहन पाटील 
घणसोली

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त