दुबार नावे वगळा
- Get link
- X
- Other Apps
येत्या नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. या पार्श्वभुमीवर ठाणे लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा मतदार क्षेत्रांमध्ये उघडकीस आलेली दुबार मतदारांची संख्या धक्कादायक आहे. ३० ऑगस्ट २०२४ रोजी जाहिर झालेल्य मतदार यादीनुसार १,९३,३०२ नावे दुबार आढळुन आलेली आहेत. मागील यादीपेक्षा जवळपास २६,००० अधिकची दुबार नावे हया सुधारीत यादीत समाविष्ट झालेली आहेत. यामुळे दुबार मतदारांची संख्या पुर्वीपेक्षा वाढली असल्याचे दिसुन येत आहे. मग मतदार यादयांच्या पुनर्निरीक्षण प्रक्रियेमधील पडताळणीबाबत साशंकता निर्माण होत आहे. तसेच या दुबार नावांचा उपयोग बोगस मतदानासाठी होण्याचीदेखील शक्यता आहे. सध्या ईव्हीएम मशीन सारख्या अद्ययावत यंत्रांनी मतदान प्रक्रिया घेण्यात येते. मात्र अशा यंत्रांमध्ये दुबार, बोगस नावे शोधण्याची कुठलीही यंत्रणा नाही. मतदार यादयांच्या कामासाठी दरवेळी शिक्षक, ग्रामसेवक व इतर विविध खात्यांतील सरकारी कर्मचारी सर्वेक्षण, प्रशिक्षण व निडणुकांच्या कामांमध्ये जुंपले जातात. यामुळे त्यांच्या मूळ कामकाजावरही परिणाम होतो. वास्ताविक, मतदार नोंदणी व मतदान प्रक्रियेत पारदर्शकता येणे फार गरजेचे आहे. आज सर्वत्र आधार कार्डचा वापर केला जात असताना याच आधार क्रमांकाचा वापर मतदान प्रक्रियेत का केला जात नाही हाच मोठा प्रश्न आहे. बँकांमधील खाती, पॅन कार्ड, सिम कार्ड काढण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य असून केवळ बोटांच्या ठशांद्वारे त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती व इतिहास ऑनलाईन उपलब्ध होते जीचा वापर त्या व्यक्तीच्या अधिकृत ओळखीसाठी केला जातो. त्यामुळे इतर कोणत्याही पुराव्याची व कागदपत्रांची गरजच भासत नाही. मतदार नोंदणीसाठी तसेच मतदान केंद्रांवर आधार क्रमांकाद्वारे मतदारांची ओळख पटवण्यासाठी यंत्रणा उपलब्ध केली तर बोगस, दुबार व मयत व्यक्तींचे होणारे मतदान संपूर्णतः बंद होईल हा विश्वास यंत्रणांसह राजकीय पक्षांना का वाटत नाही हे एक मोठे कोडे आहे. आणि महत्वाचे म्हणजे आधार बेस मतदान केल्यास सरकारी यंत्रणा कामाला लावण्याऐवजी टीसीएस, आयबीपीएस, आयआयटी यासारख्या प्राधिकृत खाजगी संस्थांमार्फत त्याच खर्चात निवडणुकीचे काम करून घेता येईल व विविध खात्यांचे नियमित कामकाज कर्मचाऱ्यांअभावी खोळंबणार नाही. त्यामुळे मतदार नोंदणी व मतदानासाठी आधार क्रमांकाचा वापर करण्यात यावा असे मत आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment