वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
आज १५ ऑक्टोबर, वाचन प्रेरणा दिन. आयुष्यभर ज्ञानग्रहण करून आपल्या यशस्वी जीवनाचा पाया रचणारे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिक्षणाची वा घराण्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना देखील एका सर्वसामान्य कुटुंबात अत्यंत गरिबीत वाढलेला मुलगा भारतातील सर्वोच्च पुरस्कार पटकावून भारतातील सर्वोच्च स्थानावर बसतात, असे भारतरत्न, माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम! त्यांच्या लेखन-भाषणातून व्यक्त होणारे सकारात्मक, प्रगल्भ विचार युवापिढीमध्ये चैतन्य आणि प्रेरणा निर्माण करीत होते. डॉ. कलामांनी सदैव आपल्या कृतीतून समाजाला प्रेरणा दिल्याने ते देशाचे आदर्श ठरले. त्यांच्या मोठेपणाचे बीज वाचनात दडले आहे. देश शक्तिशाली होण्यासाठी विद्यार्थी आणि समाजात वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे असल्याचे ते वारंवार सांगत. वाचनाने मिळणाऱ्या संदर्भामुळे व्यक्तिमत्त्व आणि भाषा विकास होतो. पुस्तकेच माणसाला समृद्ध करतात. वाचनामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते. एखादे वाक्य आयुष्याचे धेय ठरू शकतं, एवढी ताकद त्या वाचनात आहे. आजच्या युगाचा विचार केला तर वर्तमानपत्रे, पुस्तके आज घराघरातुन लुप्त होत चाललेली आहेत. डिजीटल क्रांतीमुळे छापील साहित्य हददपार होण्याच्या मार्गावर आहे. तरुणांच्या रुपात देशात उभ्या राहत असलेल्या भावी पिढीसाठी ही अत्यंत धोकाची घंटा आहे. तरुणवर्ग आज वाचनापासुन परावृत्त होण्यााचा प्रयत्न करतोय. हातोहाती आलेल्या इंटरनेटधारी अॅंड्रॉईड मोबाईलवर क्षणार्धात सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होत असल्यामुळे वाचन संस्कृती लुप्त होत चालली आहे. पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके कालबाहय होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे अनेक प्रकाशन संस्था, वृत्तपत्रे, वाचनालये अखेरच्या घटका मोजत आहेत. किंबहुना अनेक छोटी मोठी, स्थानिक वृत्तपत्रे बंद होत आहेत. ज्या पद्धतीने फोर जी, फाय जी तंत्रज्ञान पुढे आणले जात आहे, अँड्रॉइड, आय फोन यासारखे संगणकीय प्रतिभा धारण केलेले मोबाईल तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे त्या पद्धतीने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत हे अत्यंत खेदजनक वाटते. मोजके साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत, संपादक मुद्रित साहित्यासाठी आग्रही दिसून येतात. साहित्य संमेलने केवळ नावाला भरवली जात आहेत. तेथील पुस्तक विक्री व साहित्य कला अवगत करण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही रोडावत चालली आहे. वाचन व लेखन ही मानव विकासाच्या प्रथम टप्प्यातील साधने आहेत. त्यामुळे त्यांची जोपासना व परंपरा टिकवलीच पाहिजे. अन्यथा भावी पिढी अज्ञानाच्या वाटेवर जाण्यास वेळ लागणार नाही. वाचनाविषयी इतका आग्रह इथे धरण्याचे कारण हेच की प्रत्येकाने आपल्या दिवसातील काही वेळ वाचनासाठी द्यायलाच हवा. वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी मीदेखील गेल्या काही वर्षांपासून काही न काही निमित्ताने मित्रमंडळी, आप्तेष्ट, स्वकीय, सहकारी, ओळखीतल्या व जवळच्या लोकांना पुस्तके भेट देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. कुणाचे लग्न असो, वाढदिवस असो, सेवानिवृत्ती असो, घरात एखादे मंगल कार्य असो किंवा सहज घडून आलेली भेट असो दरवेळी नवनव्या व्यक्तींना पुस्तक आवर्जून भेट देतो. आजवर मी जवळपास अडीच हजार पुस्तके विविध निमित्ताने भेट स्वरूपात प्रदान केलेली आहेत. पुस्तकभेटीने घेणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर देखिल एक अनोख्या भेटीचा आनंद दरवळत होता. वस्तुुऐवजी पुस्तक भेट खऱ्या अर्थाने मौल्यवान व ज्ञानवृद्धी करणारी ठरेल. मंगल प्रसंगी पुस्तकाशिवाय इतर कोणतीही भेट समरुप व मौलिक असूच शकत नाही असे माझे ठाम मत आहे. पुस्तक भेटीने वाचन संस्कृतीच्या प्रसाराचे समाधान मिळतेच पण इतरांच्या ज्ञानात भर घातल्याची तृप्तीही मिळते. लग्न, वाढदिवस, धार्मिक कार्य व इतर सणासुदीला एकमेकांना काहीतरी भेटवस्तू देण्याची आपल्याकडे प्रथा आहे. यामुळे अनेकदा होते काय की गरजेच्या नसलेल्या वस्तूंचा अनावश्यक संचय होतो. सधन कुटुंबांना तर या गोष्टींची अडगळच अधिक वाटू लागते. पण भेटवस्तू नाकारण्याची पद्धत आपल्याकडे नसल्यामुळे ती वस्तू स्वीकारल्याशिवाय पर्यायच राहत नाही. एखाद्या व्यक्तीला भेट देताना तुला काय हवे? असे विचारण्याइतपत आपण पुढारलेलो नसल्याने वा तसे विचारण्यास अवघडलेलो असल्याने फारच अपवादात्मक परिस्थितीत अशा प्रकारे 'विचारून' भेटवस्तू दिली जाते. त्यामुळेच या सर्व विवंचनेतून शक्य तितकी सुटका करून घेण्यासाठी मी पुस्तके भेट देण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. पुस्तक भेट दिल्याने एकतर काहीतरी वेगळे व ज्ञानार्जनाचे साहित्य मिळाल्याचा समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरील आनंद व इतरांपेक्षा वेगळी भेट दिल्याचे समाधान मला फार सुखावून जाते. वाचन न आवडणारी व्यक्ती सध्या फार दुर्मिळच, त्यामुळे पुस्तक मिळाल्याने होणारा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावरून लपत नाही. खरेतर यापेक्षा अधिक ते समाधान कुठले? नेहमीच्या भेटवस्तू दिल्याने न जाणवणारा फरक मला पुस्तकांची भेट दिल्याने प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे पुस्तकापेक्षा चांगली भेट असूच शकत नाही या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो आहे. पुस्तके वाचण्याची आवड असलेल्या अनेक लोकांना माझ्या सांगण्यातील मतितार्थ लगेच लक्षात येईल. त्यामुळे आपल्यालाही पुस्तकांची आवड असेल तर छोट्याछोट्या कार्यक्रमांच्या निमित्ताने पुस्तके भेट देण्याचा उपक्रम एकदा आपण करून पाहायलाच हवा. पुस्तकांच्या रुपात भावी पिढीला मोबाईल - इंटरनेटच्या मायाजालातून बाहेर काढायचे असेल तर वाचन संस्कृती जोपासलीच पाहिजे. म्हणतात ना, वाचाल तर वाचाल !
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment