जॉय ऑफ गिव्हिंगचा येत्या २६ ऑक्टोबरला पनवेलच्या वनवासी कल्याण आश्रमातील गरजू, निराधार मुलांसाठी दिवाळी भेट उपक्रम

जॉय ऑफ गिव्हिंगचा येत्या २६ ऑक्टोबरला पनवेलच्या वनवासी कल्याण आश्रमातील गरजू, निराधार मुलांसाठी दिवाळी भेट उपक्रम
समाजातील अनेक व्यक्ती, संस्थांमार्फत गरीब, गरजू, अनाथांसाठी उपयोगी पडतील अशी मोठमोठी कामे करण्यात येत आहेत. खरेतर अशा व्यक्ती व संस्था आपल्या देशातील खरेखुरे हिरो आहेत. सध्याच्या स्वार्थी व मतलबी जगात कुठल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या अशा व्यक्तींचे व संस्थांचे कौतुकच व्हायला हवे. अशाच एका संस्थेस भेट देण्याचा आज योग आला. पनवेलजवळील निसर्गरम्य अशा चिंचवली गावाच्या हद्दीत वनवासी कल्याण आश्रमाचे गरीब, गरजू, अनाथ मुलांसाठी वस्तीगृह गेल्या जवळपास ४० वर्षांपासून चालवण्यात येत आहे ज्यात जवळपासच्या तीन चार तालुक्यातील मुले ज्यांना कुठलाही कौटुंबिक, पालकत्वाचा आधार नाही असे मुलांचे संगोपन, शिक्षण, संस्कार व कौशल्य विकास करण्याचा स्तुत्य उपक्रम अविरतपणे सुरू आहे. आमच्या जॉय ऑफ गिव्हिंग संस्थेमार्फत गरीब, गरजूंसाठी सातत्याने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम सुरू असतात. याच उपक्रमांचा भाग म्हणून येत्या दिवाळीत या वस्तीगृहातील मुलांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम आम्ही आखला आहे. जॉयचे सर्वेसर्वा गणेश हिरवे यांनी नेरुळ युथ कौंसिलचे श्री सुभाषराव हांडे देशमुख यांच्या माध्यमातून वनवासी कल्याण आश्रमास संपर्क साधला. त्यानंतर हिरवे सरांनी मला सदर आश्रमास भेट देऊन दिवाळी कार्यक्रमाचे नियोजन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मी सदर संस्थेचे केंद्रप्रमुख श्री राजेंद्र शिंदे यांना संपर्क साधून आश्रमास भेट दिली. पनवेलपासून नेरे रोडवर जवळपास १० किमी अंतरावर चिंचवली गावाच्या हद्दीत सदरचा आश्रम स्थापित आहे. सध्या या वसतिगृहात साधारणतः ४० मुले वास्तव्यास आहेत. केंद्रप्रमुख शिंदे यांच्यासमवेत संस्थेचे कार्य, उपक्रम, स्थापना व सध्या आवश्यक असलेल्या गोष्टींविषयी तासभर चर्चा केली व येत्या शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी जॉय ऑफ गिव्हिंगच्या वतीने आश्रमातील मुलांसाठी दिवाळी भेट उपक्रमाचे नियोजन केले. त्यानुसार आम्ही जॉय संस्थेच्या वतीने मुलांना दिवाळी फराळ व जीवनावश्यक तसेच किराणा किटचे वाटप व आश्रमास आवश्यक असलेल्या काही वस्तूंचे वाटप येत्या शनिवारी प्रत्यक्ष आश्रमात जाऊन करणार आहोत. यासाठी जॉयचे अध्यक्ष गणेश हिरवे सरांनी दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर झालेल्या एका मोठ्या शस्त्रक्रियेसाठी जॉयच्या सदस्यांनी जमा केलेली मात्र त्यांनी नाकारलेली आर्थिक मदत या उपक्रमासाठी देत एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या ह्या निर्णयाने व जॉय सदस्यांच्या योगदानातुन वनवासी कल्याण आश्रमातील निराधार, गरीब, गरजू मुलांची दिवाळी नक्कीच गोड होणार आहे. वनवासी कल्याण आश्रमाचा इतिहास यावेळी जाणून घेता आला. भारताच्या लोकसंख्येच्या १०% संख्या ही वनवासी - जनजातींची आहे. महाराष्ट्रात ही संख्या जवळपास ७५ लाख इतकी आहे. सन १९५२ मधे त्यांच्या समस्या हेरून वनवासी बांधवांचे कायमस्वरूपी कल्याण होण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना झाली. त्याच्या अनेक शाखा भारतभर पसरलेल्या आहेत. कोकण प्रांतामध्ये १० शाखा असून त्यापैकी पनवेल येथील हे एक वस्तीगृह आहे. ह्या आश्रमांद्वारे आरोग्य, शिक्षण, छात्रावास, खेलकूद, यासारख्या आयामांवर काम सुरू आहे. दुर्गम गावांतली "आरोग्य रक्षक" योजना, खेलकूद प्रकल्प, देशभरात चालणारी विद्यार्थी वसतीगृहे आणि इतर अनेक अभिनव उपक्रम संस्थेमार्फत चालवले जातात. ह्या आश्रमाचे संपूर्ण कार्य समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था व आश्रमातील माजी विद्यार्थ्यांच्या देणगीवरच चालत असल्याने यासाठी अधिकाधिक घटकांनी सढळ योगदान देण्याची आवश्यकता आहे. समाजात वाढत चाललेली गरीब श्रीमंत दरी कमी करण्याचे व असंख्य गरीब, गरजू, निराधार मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रत्यक्षात काम वनवासी कल्याण आश्रमासारख्या संस्थांमार्फत करण्यात येत असल्याने त्यांना समाजातून यथाशक्ति सर्वतोपरी पाठबळ मिळण्याची गरज आहे.


वैभव पाटील

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त