प्रेमळ आणि मायाळू आजी

प्रेम आणि मायेचा अविरत वाहणारा झरा थांबला
गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालो. वाशीवरून ट्रेन पकडल्यावर रोजच्यासारखे प्रकाशित झालेले लेख सोशल मीडियावर शेअर केले व लिखाणासाठी नव्या लेखाच्या विचारात होतो. वडाळा स्थानक आल्यावर दहाच्या सुमारास अचानक भावाचा फोन आला व धक्कादायक बातमी कानावर पडली. काटीच्या आजीच्या निधनाच्या बातमीने काही क्षण मन सुन्न झाले व लगेच स्टेशनवर उतरत उलट दिशेची गाडी पकडून गावाकडे निघालो. दोनच दिवसांपूर्वी जया मावशीचा मुलगा आशिषचा फोन आला होता व आजीची प्रकृती खालावत चालल्याचे त्याने कानावर घातले होते व मला भेटायला बोलावले आहे असा आजीचा निरोपही त्याने मला दिला. नवरात्रीत घट व कुलदैवतांच्या दर्शनासाठी गेल्यावर शनिवारी आजीकडे जाऊ असेदेखील मनाशी ठरवले. मात्र त्याआधीच आजीने आम्हा सर्वांचा घेतलेला निरोप तिच्या अखेरच्या भेटीची सल मनात कायम कोरणारा ठरला. माझी आजी कै सुमंता परशुराम पाटील हिने गुरुवारी सकाळी ९च्या सुमारास घटस्थापनेच्या दिवशी अखेरचा श्वास घेतला आणि आम्हा सर्वांना पोरके केले. तिच्या जाण्याने तिची सर्व नातवंडे अक्षरशः धाय मोकलून रडत होती आणि आजीने आम्हा सर्वांवर केलेले अतोनात, निस्पृह प्रेम मनात दाटवून त्याला मोकळी वाट करून देत होते. मलाही त्या क्षणी अश्रू आवरणे कठीण झाले. वयाची पंचाहत्तरी गाठलेली आजी तीन वर्षांपूर्वी तिच्या सर्वात लाडका मुलगा भाईमामाच्या दुर्दैवी निधनाने व्यथित झाली होती. त्यात तिच्या पायाच्या ऑपरेशनने तिला अंथरुणाला खिळवून ठेवले. दैनंदिन हालचाल पूर्णतः ठप्प झाल्याने तिचे अवसान गळून गेले होते. मात्र पती, मुली, नातवंडांच्या प्रेम व मायेखातर त्यांना पाहून दिवस ढकलत होती. पती, तीन मुली व दोन मुलांचा प्रपंच लाभलेल्या आजीने आमच्या लहानपणात जे प्रेम व माया दिली ती आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. गौरी सणाला सर्व मुली, नातवंडांच्या कलकलाटाने मामाचे घर आनंदाने ओसंडून वाहायचे. त्या सर्वांची आवर्जून सर्वार्थाने काळजी घेणारी आजी आजही डोळ्यासमोरून जात नाही. नातवंडांवर जीवापाड प्रेम करणारी आजी अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या आठवणीत रमलेली होती. मोठया मुलीचा मोठा मुलगा या नात्याने माझ्यावर तिचा खूप विश्वास व विशेष प्रेम होते. घरातील एक मोठा 'आनंदी क्षण म्हणजे तुझा जन्म' असे ती मला सांगायची. तूच मोठा आहेस, मामालाही चुकीच्या क्षणी समजव, सर्वांच्या अडचणीत कायम उभा राहा, घरी येत राहा असे वारंवार सांगत होती. आजोळी गेल्यावर मला काय हवे, काय नको हे पाहणारी, देणारी व मला सर्वात जास्त माया लावणारी आजीच होती. आज तिच्या जाण्याने घर पुरते रिकामे झाले, घरातील ममता निघून गेली. आजोबांचेही वय झालेय, त्यांना आजीचा शाब्दिक आणि अस्तित्वाचा आधार होता, तो ही आता निघून गेलाय. एकीकडे करारी, शिस्तप्रिय आजोबांचे पतित्व तर दुसरीकडे मोठया कुटुंब कबिल्याची जबाबदारी याची उत्तम सांगड आजीने आयुष्यभर घातली. कुटुंबाप्रमाणेच तिने नातलग व आप्तस्वकीयांवरही तितकेच प्रेम केले, त्यांचा आदर केला. शेतीसारख्या कामात प्रचंड काबाडकष्ट केलेल्या आजीला अखेरच्या क्षणी बेडवर पडून राहावे लागले याचेच दुःख आहे. मामाच्या हयातीत तिच्या एका पायाचे यशस्वी ऑपरेशन ठाण्यात झाले, मात्र काही दिवसांनी घरात पडून तिचा दुसरा पायही जायबंदी झाला, त्यावेळी डॉक्टरांनी आता तिचे वय पाहता दुसरे ऑपरेशन झेपणार नाही असे सांगितल्यावर नाईलाजाने तिला बेडवर राहण्यास भाग पाडले. या काळात गावातच राहत असलेल्या जया मावशीने स्वतःच्या प्रापंचिक आयुष्यात मोठ्या तडजोडी करत तिची मनापासून सेवा केली. तिच्या जाण्याने कुटुंबात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून निघणे कदाचित अशक्यच आहे. कुटुंबावर झालेला हा आघात काही दिवसांत भरून निघेल मात्र आजोळी वाहणारा प्रेम व मायेचा अविरत झरा तिच्या जाण्याने कायमचा थांबलेला आहे हे सत्य आता मान्य करावेच लागेल. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त