विश्वविक्रमविर, गायक, दिग्दर्शक, निर्माता, लेखक विराग मधुमालती यांचा पर्यावरण रक्षणासाठी अनोखा उपक्रम

पर्यावरण रक्षणासाठी विराग मधुमालती यांची चालत १२०० किलोमीटरची १ लक्ष वृक्षलागवड दिंडी
पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील अनेक घटक आपापल्या परीने योगदान देत असतात. आगामी काळात निसर्गाचे संतुलन राखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. यासाठी आपले प्रत्येक पाऊल पर्यावरणस्नेही असायला हवे. असाच निसर्ग संतुलनाचा संदेश घेऊन नवी मुंबईतील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अनेक विक्रम करणारे विराग मधूमालती हे नवी मुंबईतुन नाकोडा जी पर्यंतचा १२०० किलोमीटरचा प्रवास पायी करत निघाले आहेत. १५ सप्टेंबर पासून सुरू झालेला हा प्रवास सध्या ४०० किलोमोटरच्या टप्प्यावर सुरतच्या पुढे असून ह्या प्रवासात १ लाख वृक्षलागवडीचा संकल्पदेखील ते पूर्ण करताना दिसत आहेत. या प्रवासात जागोजागी लोकांना ते पर्यावरण संवर्धन व वृक्षलगवडीचा संदेश देत त्यासाठी प्रवृत्त करत आहेत. त्यांच्या ह्या स्तुत्य उपक्रमासाठी प्रवासात त्यांचे ठिकठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून जंगी स्वागत करण्यात येत आहे. विराग ह्यांनी संगीत क्षेत्रात आजवर ५ वेळा विश्वविक्रम प्रस्थापित केलेला असून सिनेचित्रसृष्टीमध्ये ते निर्माता, लेखक, दिग्दर्शक म्हणूनदेखील सुपरिचित आहेत. पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावरील त्यांचा चित्रपट विशेष चर्चेत आला होता. नेत्रदानासाठी ते १९९८ पासून तन, मन, धनाने कार्यरत असून नेत्रहीन लोकांच्या त्रासाची झळ ज्यांना दृष्टी आहे त्यांना कधीच लागणार नाही पण त्याच दृष्टीहीन बांधवांच्या त्रासाची जाण ठेवत आणि नेत्रदानाचा पवित्र संदेश देत तब्बल १०० दिवस डोळ्याला पट्टी बांधत,१०० पेक्षा जास्त नेत्रदान जागरूकता मोहिमा त्यांनी राबवल्या. यादरम्यान त्यांनी महाराष्ट्रभर शेकडो कार्यक्रम सादर करत लोकांमध्ये नेत्रदानाविषयी मोठी जनजागृती केली होती. ते स्वतः उत्तम गायक असून त्यांच्या अनेक कलाकृती समाजमाध्यमांवर पाहायला मिळतात. नेत्रदानाची चळवळ उभ्या महाराष्ट्रात पसरवणाऱ्या विराग यांनी समाजाला दिलेले योगदान नाकारता येणार नाही. अवयवदानाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत ठळकपणे पोहचावा यासाठी चक्क पाण्याखाली राहून सुरमधुर गाण्यांची (underwater singing) माळ गुंफलेली होती. आजवर विश्वविक्रमाचे सर्व कार्यक्रम विराग यांनी जाहीर कार्यक्रमाद्वारे लोकांसमोर सादर केले आहेत. गेल्या काही वर्षांच्या अथक परिश्रम आणि संशोधनानंतर त्यांनी तब्बल १७ लाख संगीत अलंकारांची निर्मिती केली असून याचा २ लाख पानांचा आणि चक्क ४० फूट उंच जाडीचा संगीतग्रंथ "संगीत का महासागर" या नावाने निर्मित केला आहे. अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केलेले विराग मधुमालती हे नाव केवळ मुंबई महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी भूषणावह ठरले आहे. सामाजिक उपक्रमांची प्रचंड ओढ असलेले विराग यांना समाजासाठी काहीतरी करण्याच्या इर्षेने पछाडले आहे. पेशाने इंजिनिअर असलेल्या विराग यांनी गेल्या काही वर्षांत विपरीत परिस्थितीवर मात करत आपल्या जिद्दीच्या जोरावर अनेक विश्वविक्रमाँना गवसणी घातली आहे. मग तो चीनचा ४५६ तासांचा सलग गायनाचा विक्रम मोडीत काढून ५५५ तासांचा सलग गायनाचा विक्रम स्थापित केलेला असो की ३०० गायकांच्या सहभागाने रिले पद्धतीने गायलेले चित्रपटगीत असो. सुप्रसिद्ध गायक, निर्माता, दिग्दर्शक, गायन अभिनय प्रशिक्षक या सर्वच पातळ्यांवर ते प्रचंड यशस्वी ठरले आहेत. नेत्रदान चळवळीमध्ये त्यांनी दिलेले योगदान नक्कीच दखलपात्र आहे. स्वतः डोळ्यावर पट्टी बांधून नेत्रदानाचा संकल्प व आवाहन करताना आम्ही त्यांना पाहिले आहे. अभिनय, गायनाची आवड असलेल्या, हरहून्नरी, समाजासाठी काहितरी करण्याची इच्छा असलेल्या कलाकारांना सोबत घेऊन अनेक अनोखे उपक्रम हाती घेणाऱ्या विराग यांची बातच काही और आहे. त्यांच्या ह्या वेगळेपणामुळेच ते कायम लक्षात राहतात. मिशन सेव्ह मदर अर्थ म्हणजेच मातृभूमी वाचवण्याच्या मोहिमेचा ध्यास घेतलेला आहे.  पर्यावरणाकडे होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे निसर्ग आज वेगाने विनाशाकडे वाटचाल करत आहे. वाढते शहरीकरण व सिमेंट काँक्रीटच्या जंगलात निसर्ग लुप्त होत आहे. ही परिस्थिती कुठेतरी बदलायला हवी. त्यासाठी हातावर मोजणारे पर्यावरण प्रेमी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यात आता विराग मधुमालती या नावाचा समावेश झाला आहे. वीराग मधुमालती यांनी निसर्ग वाचवण्यासाठी अनेक संकल्प सोडलेले आहेत त्यात त्यांनी स्वतः गेल्या वर्षापासून प्लास्टिक डिस्पोजेबल बॉटलमध्ये आजन्म पाणी न पिण्याचा संकल्प केलेला आहेत. सन २०११ पासून  पाण्याचे होणारे प्रदुषण टाळण्याकरिता ते गणपती बाप्पाचे विसर्जन करीत नाहीत. विराग मधुमालती यांचा धरती रक्षणाचा हा ध्यास अनेकांना विचारमंथन करण्यास भाग पडणारा आहे. सध्या त्यांचा नाकोडापर्यंत सुरू असलेला तब्बल १२०० किलोमीटरचा प्रवास अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरत असून त्यांना जागोजागी यासाठी भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेक मान्यवर, राजकीय सामाजिक धार्मिक व्यक्ती, शालेय मुलांचा सहभाग त्यांना यादरम्यान लाभत आहे. या प्रवासात १ लक्ष वृक्षलागवडीचा त्यांचा स्तुत्य असा संकल्पही ते पूर्ण करताना दिसतात. विराग मधुमालती यांचा जीवन व कार्यप्रवास गेल्या काही वर्षांपासून जवळून न्याहाळत असताना त्यांच्या ह्या जगावेगळ्या उपक्रमासाठीच्या प्रवासास एक नवी मुंबईकर व भारतीय म्हणून मनापासून शुभेच्छा देतो आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या त्यांच्या ह्या प्रवासात अधिकाधिक पर्यावरणप्रेमींचा सहभाग लाभो अशी मनोकामना व्यक्त करतो. 


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त