वात्सल्य ट्रस्टच्या बालिकाश्रम व वृद्धाश्रमात जॉय ऑफ गिव्हिंगची दिपावली पाडवा भेट

शनिवार २ नोव्हेंबर २०२४ रोजी दिपावली पाडव्याचे औचित्य साधून जॉय ऑफ गिव्हिंग ह्या सोशल ग्रुपच्या वतीने सानपाडा (नवी मुंबई) येथील वात्सल्य ट्रस्टच्या बालिकाश्रम व वृद्धाश्रमात दिवाळी भेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह्या अनाथालयातील जवळपास ५२ बालिका व वृद्धांना दिवाळी फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जॉयचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या ह्या उपक्रमावेळी जॉयचे नवी मुंबई समन्वयक वैभव पाटील, सदस्य हॅप्पी रायडर गजानन पाटील, दत्ता रातवडकर, विजय फणसेकर, निलेश घोडविंदे, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष घोलप, ठाणे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचे उपअभियंता प्रदीप पाटील, नेरुळ युथ कौंसिलचे सुभाष हांडे देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वात्सल्यचे व्यवस्थापक श्री बापूराव काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करत संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन वैभव पाटील यांनी केले. १९८३ साली स्थापन झालेल्या वात्सल्य ट्रस्टने आजवर हजारो बालिका व वृद्धांना मायेचा आधार दिला आहे. जेष्ठ व बालिका असे आजी - नातींचे अनोखे नाते येथे पाहायला मिळते. जॉयच्या ह्या उपक्रमाने भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला साजऱ्या झालेल्या ह्या उपक्रमाने येथील वृद्ध व मुलींच्या चेहऱ्यावरील दिवाळीचा आनंद लपला नाही. त्यांनीदेखील जॉयच्या सदस्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देत धन्यवाद दिले. आपल्या प्रास्ताविकात वैभव पाटील यांनी उपस्थितांना जॉयच्या कार्याची माहिती देत सोबत आलेल्या सदस्यांची विस्तृतपणे ओळख करू दिली. वात्सल्य ट्रस्ट करत असलेले कार्य एकमेवाद्वितीय असून ह्या संस्थेने आजवर हजारो निराधार व्यक्तींना मायेचा आधार दिला असल्याचे स्पष्ट करत मुलांना योग्य शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर संस्थेच्या कार्यास हातभार लावण्याचा सल्ला दिला. प्रत्येकाने आपल्या कमाईतील काही वाटा सामाजिक बांधिलकी म्हणून गरीब, गरजू लोकांना दिला पाहिजे असे मत व्यक्त करताना जॉयच्या सर्व उपक्रमांचे श्रेय ग्रुपच्या संपूर्ण टीमचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सुभाष हांडे देशमुख, डॉ घोलप तसेच अभियंता प्रदिप पाटील यांनीदेखील मनोगते व्यक्त करत सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. युथ कौंसिलच्या देशमुख यांनी आपल्या खुमासदार भाषणात मुलांना अनेक टिप्स देत जॉयच्या कार्याचे व वाटचालीचे कौतुक केले. जॉय चे अध्यक्ष गणेश हिरवे यांच्या मार्गदर्शन व अथक प्रयत्नाने जॉयची वाटचाल अनेक सदस्य जोडणारी व त्या माध्यमातून हजारो गरजूंपर्यंत पोहोचणारी ठरत आहे असे विषद करत शेवटी पाटील यांनी सदरच्या उपक्रमासाठी सढळ हस्ते सहकार्य करणाऱ्या सर्व सभासदांचे, उपस्थित मान्यवरांचे व वात्सल्य ट्रस्टचे आभार मानले. श्री गणेश हिरवे यांनी दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर झालेल्या एका मोठ्या शस्त्रक्रियेसाठी जॉयच्या सदस्यांनी जमा केलेली मात्र त्यांनी नाकारलेली आर्थिक मदत या उपक्रमासाठी देत सामाजीक कार्यात एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. यानंतर मुलांना व वृद्ध व्यक्तींना दिवाळीचा फराळ, पेन, पुस्तक, मिठाई व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Comments
Post a Comment