वाढदिवस माझा
वाढदिवस
खरंतर वाढदिवस हा गतकाळातील आठवणींना उजाळा देण्याचा दिवस असतो आणि त्याचबरोबर हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी रुपरेषा आखण्याची. वाढदिवस म्हणजे दिवसभर शुभेच्छा स्वीकारण्याचा आणि कौतुक करवून घेण्याचा 'स्पेशल' दिवस. सकाळपासून शुभेच्छांचा पाऊस सुरू झालाय तो अजुनही तसाच आहे. पण या निमित्ताने आपला विस्तारलेला परीघ लक्षात येत जातो.. नातेवाईक, आप्तेष्ट, कार्यालयीन सहकारी, ओळखीचे, हितचिंतक, मित्र मनापासून शुभेच्छा देतात. कुणीतरी मध्येच आपल्याविषयी लिहून जातं, गाऊन जातं. याहीवर्षी अशीच काही surprizes मिळाली. पण खरं सांगायचं तर याच दिवशी मागे वळून पाहावंसं वाटतं. आज वयाची चाळीशी ओलांडली. बॅचलर आयुष्यातून प्रपंचात प्रवेश, कुटुंबकबिला, जबाबदा-या सांभाळताना वाचन, लिखाण, सर्वांसाठी सदैव जमेल तशी मदतीची तत्परता तसेच सामाजिक भान ढळू दिलेले नाही याचे समाधान जास्त आहे. खरेतर अशा प्रवासात अनेकांच्या अपेक्षा वाढतात, अनेकजण दुखावतात, दुरावतात, पण थांबून चालत नाही. सभोवतालचा गोतावळा कायमच नवी उमेद देत असतो. आतापर्यंत काय सोडलं, काय सरलं आणि काय उरलं हे कधीमधी पाहावंसं वाटतं पण वाढत्या जबाबदाऱ्या त्यालाही वेळ नाहीत. त्यात आयुष्याच्या गणिताचा मेळ लागला की खूप छान वाटतं. चुकलेल्या निर्णयांची खंत संपत नाही अन नव्या वाटांची ओढ थांबत नाही... पण खरंतर असंच जगण्यात खरी मजा आहे. वय कितीही मोठं झालं तरी उरलेलं आयुष्य अधिक चांगला, संवेदनशील, संयमी, समजूतदार माणूस म्हणून जगणं फार महत्त्वाचं पण आव्हानात्मक असते. आजवर अनेक सोबती मिळवले, नव्या नात्यांबरोबर कौटुंबिक गोतावळा वाढतच जाणार, सर्वांना पुरेसा वेळ देता येईलच असे नाही मात्र मनाला आवडेल, रुचेल, जमेल ते करण्याचे ठरवलंय. आज सकाळपासून अनेकांचे फोन आले, सोशल माध्यमांवर असंख्य संदेश आले, कार्यालयात असल्याने सर्वांनाच प्रतिसाद देता आला नाही. जोगेश्वरीचे आमचे जवळचे मित्र व जॉयचे संस्थापक हिरवे सर तर शुभेच्छा द्यायला आजारी असतानाही दुपारी थेट ऑफिसमधेच शाल, पेढे, पुस्तके, फळांची पिशवी घेऊन पोहोचले. कार्यालयातील जवळपास सर्वच सहकारी व अधिकाऱ्यांनी भेटून, अनेकांनी केक आणून शुभेच्छा दिल्या. पत्नीची निवडणूक ड्युटी असल्याने काल रात्रीच घरी छोटेखानी वाढदिवस साजरा केला. मोबाईलवरील शुभेच्छांचा वर्षाव पाहून अखेर ऑफिसमधून परतताना लोकलमध्ये बसून आभाराचा संदेश लिहायला घेतलाय. खरंतर कुठल्याही चांगल्या गोष्टीचे आभार मानूच नयेत या मताचा मी आहे कारण त्यातून परतफेड होते व माणूस ऋणमुक्त होतो. आपणा सर्वांच्या शुभेच्छा भारावून टाकणाऱ्या आहेत व उर्वरित आयुष्य अधिक जोमाने जगण्यास बळ देणाऱ्यादेखील.. बाकी काय, छान चाललंय...!!
असाच लोभ असावा....
वैभव
Comments
Post a Comment