निसर्गसौंदर्याने नटलेला दापोलीचा श्री क्षेत्र केशवराज मंदिर परिसर

निसर्गसौंदर्याचा अद्भुत मिलाप 

कोकण हा खऱ्या अर्थाने निसर्गसौंदर्याचा खजिना आहे. इथली अनेक ठिकाणे मनाला भुरळ घालणारी आहेत. कोकण ज्याप्रमाणे विस्तीर्ण अशा समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते तशीच ओळख इथल्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचीदेखील आहे. अशाच एका धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा योग नुकताच आला. दापोलीजवळील केशवराज मंदिर हे निसर्गप्रेमींना आकर्षित करणारे ठिकाण आहे. दापोलीला मुक्कामी असताना ह्या ठिकाणाबद्दल अनेकांनी दिलेल्या माहितीनुसार भेट दिली. दापोली शहरापासून सहा सात किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्या ठिकाणाकडे सकाळी लवकर उठून सात वाजताच माझे साडू जितेश जाधव यांचेसह निघालो. आसूदबागेतून तिथे जाता येते. दापोलीपासून आसूदबाग ६ किलोमीटर अंतरावर आहे. आसूदबागला दाबकेवाड्यापासून खालच्या बाजूस पायवाट जाते. गाडी तिथेच पार्क करून खालच्या बाजूस श्री केशवराज मंदिराकडे पायवाटेने आम्ही निघालो. श्री क्षेत्र केशवराज येथे जाताना, सुरुवातीला एक ब्राम्हणवाडी लागते. इथे अस्सल कोकणी पदार्थांची अनेक छोटीछोटी दुकाने आहेत. काही अनुभव इतके अभूतपूर्व असतात की त्यातून आयुष्यभर पुरेल अशा आठवणींचे संचित निर्माण होत असते. त्यातीलच हा एक. नारळ सुपारीच्या बागांतून सूर्यकिरणे अंगावर घेत डोंगर उतरून जाणे आणि मग साकव पूल ओलांडून पुन्हा टेकडी चढणे. त्या नीरव निसर्गविश्वात खळाळणारे पाणी असो किंवा पक्ष्यांची किलबिल असो. एक एक आवाज स्पष्ट आणि मनाला भिडणारा. नारळ-पोफळीच्या दाट बागा, वाळत घातलेल्या सुपाऱ्या आणि पांरंपरिक पद्धतीच्या कोकणी टूमदार घरांचे सौंदर्य इथे पाहायला मिळाले. काही सेंकंद पायी चालल्यावर स्वर्गातील सौंदर्याची जाणीव होईल, असा हिरवागार निसर्ग सभोवती दिसला. झुळझुळ वाहणारे पाणी, पोफळीची सरळ उभी असलेली झाडे, सकाळच्या शांत, निरव वातावरणातील पक्षांचा किलबिलाट, रस्त्यावर पडलेला गुलागीशार जामच्या फुलांचा सडा, हवेतला गारवा अशा रम्य वातावरणातील भटकंती संस्मरणीय अशीच ठरली. मध्ये लागणाऱ्या कोटजई नदीच्या पात्रावरील पूल ओलांडून डोंगरावरील मंदिराकडे जायला चढणाचा पण पायऱ्यांचा रस्ता आहे. नदीचे पात्र ओलांडताना पुलावरून उगवत्या सूर्याचे छान दर्शन घडले. त्या सुर्यकिरणांमध्ये खळखळत्या पाण्याचे सौंदर्य अधीकच खुलून दिसते. निसर्गाचे ते अद्भुत सौंदर्य मोबाईलच्या कॅमेऱ्यात साठवून आम्ही मंदिराकडे निघालो. निसर्गाच्या या वैभवाचा आनंद घेत टेकडी चढली की अचानक समोर येतं हे मंदिर. आसूदबाग या ठिकाणाजवळ भातखंडी नदी ओलांडली की पुढची वाट ही १५० ते २०० पायऱ्यांची आहे. ही चढवाट थोडी थकवणारी असली तरीही मंदिराचा परिसर थंडगार सावलीचा असल्याने श्रमपरिहार लगेचच होतो. आकाशाकडे पाहताच दिसणारे फणस आणि कोकण निसर्ग सौंदर्य अनुभवताना लागणारी घरे. मंदिर पेशवेकालीन असून श्री विष्णूची सुंदर मुर्ती गाभाऱ्यात आहे. हे दैवत श्री लक्ष्मी केशवराज म्हणूनही परिचीत आहे. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या गोमुखातून थंड आणि शुद्ध पाणी चोवीस तास वाहत असते. दगडाच्या चिंचोळ्या नालीतून हे पाणी खाली आणले गेले आहे. मंदिरामागे झरा आहे त्याला बाराही महिने पाणी असते. ते खरंखुरं मिनरल वॉटर गोमुखाने मंदिरात येते. ते ओंजळीतून प्यायचे आणि तृप्तीचा अनुभव घ्यायचा. केशवराजाचे दर्शन घेतल्यानंतरही परिसरातून बाहेर पडावेसे वाटत नाही. निसर्गाचा हा अद्भूत अविष्कार प्रत्येकाने एकदातरी अनुभवायला हवा असाच आहे. श्री क्षेत्र केशवराज मंदिर परिसरातील भ्रमंतीच्या त्या आठवणी मनात साठवून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त