कोल्हापूरच्या पन्हाळा किल्ल्याला संस्मरणीय भेट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींचा खजिना
कोल्हापूरच्या अंबाबाई मातेच्या दर्शनासाठी सहकुटुंब जाण्याचा नुकताच योग आला. कोल्हापूर ही ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आसपासच्या परिसरात पाहायला मिळतात. यातीलच एक ठिकाण म्हणजे किल्ले पन्हाळा. मागील शनिवारच्या रात्री कोल्हापूरला पोहोचल्यावर रात्रीच्या आरतीसमयी आम्ही महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर काही वेळ बाजारपेठेत फिरलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच पन्हाळा भेटीचा बेत ठरला होता. सकाळी सात वाजताच मी साडू जितेश यांच्यासह पन्हाळ्याकडे कूच केली. पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. अर्ध्या तासातच साडेसातच्या सुमारास किल्ल्यावर पोहोचलो. पन्हाळा हा एक विस्तीर्ण किल्ला असून प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशा तीनही कालखंडांचा साक्षीदार आहे. पन्हाळा किल्ल्याच्या वैभवाची प्रचिती देणाऱ्या असंख्य वास्तू गडावर आजही आहेत व त्या वैभवात भर घालणारी एक वास्तू म्हणजे सज्जाकोठी. पहिल्यांदा आम्ही थेट ह्या सज्जा कोठीवरच गेलो. इथून सभोवतालच्या चौफेर परिसराचे विहंगम दर्शन होते. महाराजांनी बहुदा ही जागा शत्रूच्या हालचाली टिपण्यासाठीच बांधली असावी. सध्या ह्या किल्ल्याचा सर्व सुविधायुक्त विकास करण्यात आला असून नगरपरिषद, न्यायालये, मानवी वस्ती, हॉटेल्स, पायाभूत सोयी सुविधा असणारा हा पहिलाच किल्ला आहे. त्यामुळे हा किल्ला इतरांपेक्षा वेगळा असून  संपूर्ण किल्ल्यावर आपण वाहनासह भ्रमंती करू शकतो. सिध्दी जोहारने पन्हाळ गडाला चार महिने वेढा दिला होता, एका पावसाळ्या रात्री ह्या वेढ्यातुन सुटुन महाराज विशाळगडला गेले, सिध्दी जोहारने त्यांचा पाठलाग केला तेव्हा बाजीप्रभु देशपांडे ह्यांनी पावनखिंड येथे त्याला अडवले, त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहचु शकले, परंतु बाजीप्रभु देशपांडे येथे धारातिर्थ पडले. त्यांच्या कामगिरीची आठवण म्हणून पन्हाळ्यावर बाजी प्रभू देशपांडे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. येथे आजही शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते. इथल्या प्रत्येक ठिकाणामागे मोठा इतिहास दडलेला आहे. ह्या गडाच्या आत संभाजी मंदीर, सोमेश्वर मंदीर, तीन दरवाजा, राज दिंडी इत्यादी परिसर आहे. एक सुंदर असे विस्तीर्ण पक्षितीर्थ उद्यानदेखील किल्ल्यावर विकसित करण्यात आले आहे ज्याचे प्रवेशद्वार व उद्यानात उतरण्याचा रस्ता विशेष लक्ष केंद्रित करतो. गडाच्या पुर्वेकडील दरवाजाला चार दरवाजा म्हणतात, ज्यामधुन गडामध्ये येण्यास मार्ग आहे, ह्याचा नाश ब्रिटीशांनी केल्याचे समजते. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात आम्ही किल्ल्यावर जवळपास दोन तास भ्रमंती केली तरीदेखील वेळेअभावी किल्ल्यावरील अनेक ठिकाणे पाहता आली नाहीत. सकाळच्या वेळेत अनेक शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी व पन्हाळ्यावरच मुक्कामी असलेले पर्यटक गाईडसह किल्ला न्याहाळताना दिसले. कोल्हापूरला गेल्यानंतर पन्हाळा गडाला अवश्य भेट देऊन महाराजांचा ज्वलंत इतिहास प्रत्येकाने अनुभवायलाच हवा. सकाळी साडेनऊच्या सुमारास किल्ल्यावर चहा घेऊन आम्ही कोल्हापूरकडे मार्गस्थ झालो. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त