एनएमएमटी परिवहन सेवेकडे दुर्लक्ष
नवी मुंबई महानगरपालिकेचा एनएमएमटी हा परिवहन उपक्रम शहरांतर्गत वाहतुकीसाठी निर्माण केला गेला. कालांतराने त्याचा विस्तार करून शेजारील पनवेल, ठाणे, कल्याण डोंबिवली, बदलापुरपर्यंत एनएमएमटी धावू लागली. मात्र त्यात ज्या प्रमाणात सुधार व वाढ अपेक्षित होती ती न झाल्याने आज ह्या परिवहन सेवेला घरघर लागली आहे. मधल्या काळात आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील तुकाराम मुंढे हे अधिकारी असताना या सेवेला डिजिटल रूप देऊन आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न झाला. मुळात महानगरपालिकेने स्वतःची सार्वजनिक परिवहन सेवा बळकट करण्यासाठी ठोस उपाययोजना करून मुबलक निधी ह्या सेवेला द्यायला हवा. ह्या सेवेचा वापर करणारे प्रवाशी हेदेखील नवी मुंबईचे करदाता आहेत. ज्या प्रमाणात स्वच्छता, रस्ते, पथदिवे, नाले, गटारे यासारख्या पायाभूत सुविधांकडे महानगरपालिका लक्ष केंद्रित करतेय त्या प्रमाणात सार्वजनिक वाहतूक म्हणजे एनएमएमटी बळकटीकरणासाठी लक्ष दिले जात नाही असे चित्र आहे. त्यामुळे आजही नवी मुंबईतील प्रवाशांना एनएमएमटीपेक्षा बेस्टचा प्रवास अधिक सुखदायक वाटतो. नवीन बसेसची उपलब्धता, विविध मार्गांवरील फेऱ्यांमध्ये वाढ, बस स्थानकांवर निश्चित वेळ दाखवणारे डिजिटल इंडिकेटर्स, तिकीट आरक्षणासाठी व बसेसची स्थिति पाहण्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशनची निर्मिती अशा गोष्टी करणे प्रवाशी हिताचे आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment