नागपूरचे श्रीगणेश टेकडी मंदिर

मागील आठवड्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडले. आठवडाभर सुरू असलेल्या ह्या अधिवेशन काळात नागपुरातील काही ठिकाणांना भेट देण्याचा मी आवर्जून प्रयत्न करत असतो. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे टेकडी गणेश मंदिर. गेल्या बुधवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचे निमित्त साधून कार्यालयीन सहकाऱ्यांसह मी ह्या श्रीगणेशाचे दर्शन घेतले. नागपुरातील टेकडी गणपती मंदिर हे अत्यंत प्राचीन आहे. या ठिकाणी असलेल्या श्रीगणेशाची मूर्ती स्वयंभू आहे. पूर्वीच्या काळात भोसले राजघराण्यातील मंडळी नियमित येथे दर्शनाला येत होते. टेकडीच्या गणपतीचा ३५० वर्षे जुना इतिहास आहे. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये पहिला मान टेकडी गणपतीला आहे. असंख्य भाविकांचे आराध्य दैवत असलेले टेकडी गणपती मंदिर हे नागपूर रेल्वे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. सीताबर्डीच्या टेकडीवर हे गणपती मंदिर असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. पूर्वी या ठिकाणी असलेला स्टेशन समोरील भला मोठा ब्रिज पाडण्यात आला आहे. त्यामुळे येथील रहदारीची समस्या बऱ्यापैकी सुटलेली आहे. १८१८ साली नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मराठा-ब्रिटिश युद्धात अप्पा साहेबांचा पराभव झाला. त्यानंतर इंग्रजांनी सीताबर्डीच्या किल्ल्यावर ताबा मिळवला. याच टेकडीचा पूर्व भाग फोडून नागपूर रेल्वे स्टेशन निर्माण करण्यात आले. सुरुंग लावून हा भाग पडत असतानाच गणेशाची मूर्ती दृष्टीस पडली. याच कारणामुळे या मूर्तीला स्वयंभू गणेश मूर्ती असे म्हटले जाते. पिंपळाच्या झाडाखाली ही मूर्ती प्रकट झाली होती. आजही हा गणपती बाप्पा पिंपळाच्या झाडाखाली विराजमान आहे. काळाच्या ओघात मंदिरात अनेक स्थित्यंतरे आली. भाविकांच्या अपार श्रद्धेतून मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असे मंदिर आज भाविकांसाठी निर्माण झाले आहे. नागपूरकरांचं आराध्य दैवत असलेल्या या बाप्पाला भेट देण्यासाठी अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावत असतात. दरवर्षी हिवाळी अधिवेशन काळात राज्यभरातून नागपूरला येणारी बहुतांश मंडळी या देवस्थळी येऊन बाप्पाचरणी लीन होत असतात. नागपूरच्या गुलाबी थंडीत सकाळी या मंदिरापर्यंतचा प्रवास मॉर्निंग वॉकधारकांसाठी एक पर्वणीच ठरतो. संकष्टीला झालेल्या बाप्पाच्या दर्शनाने कृतार्थ होत आम्ही मार्गस्थ झालो. 

वैभव 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त